मध्य भारतापासून थरच्या वाळवंटापर्यंतच्या भूभागाने संपूर्ण उन्हाळाभर कडक ऊन सहन केलेले असते. त्याचीच परिणती म्हणून भारतीय उपखंडावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हवेच्या दाबातली ही दरी भरून काढण्यासाठी हिंदी महासागरावरून दमट वारे केरळमार्गे आपल्या दिशेने धावत सुटतात आणि हिमालयाच्या छातीवर आढळतात. वाऱ्यांच्या या प्रवासातूनच पाऊस पडतो.
पुढचे चार महिने सजीवसृष्टीच्या जल्लोषाचे, उत्सवाचे असतात. झाडे, फुले, लता, वेली, कीटक, पशू-पक्षी सारे सारे अतिशय उत्साहात असतात, लगबगीत असतात. हाच बहुतेक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. कोकिळा, चातक, पावशा हे सारे कोकिळेच्या जातकुळातले पक्षी बाकीच्या कष्टकरी पक्ष्यांच्या घरटी बनवण्याच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतात आणि कष्टकरी पक्ष्यांचे लक्ष नाही ना, हे पाहून संधी साधतात. त्यांच्या घरटय़ात आपले अंडे घालतात. अशी संधी काही कोकीळकुलोत्पन्नांना सहजासहजी मिळत नाही. अशा वेळी निसर्गाने या पक्ष्यांना एक दैवी देणगी दिली आहे. कोकीळ पक्षी संपूर्ण तयार झालेले अंडे स्वत:च्या पोटातच ठेवू शकतो व जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा ते अंडे घालतात. थोडक्यात, अंडी घालण्याची वेळ ही कोकीळ पक्ष्यांच्या स्वत:च्या नियंत्रणात असते.
या सगळ्या कोकिळेच्या जातींसोबत ‘कारुण्य कोकिळा’ नावाचा अजून एक पक्षीही पावसाळ्यात ठाणे, कोकण परिसरात येतो. मात्र कोकिळेच्या इतर जातीपेक्षा कारुण्य कोकिळा ही आकाराने फारच लहानखुरी असते. तिचा आकार साधारणत: साळुंकीएवढा असतो.
वटवटय़ा, शिंपी, शिंजीर यांसारख्या छोटय़ा पक्ष्यांच्या घरटय़ात कारुण्य कोकिळा आपले अंडे टाकतात. अनेकदा हे छोटे पक्षी स्वत:च्या आकारापेक्षा मोठय़ा झालेल्या कारुण्य कोकिळेच्या पिलांचे संगोपन करताना दिसतात.
जंगले, डोंगर-उतारावरील वनराई, बागायतींमध्ये पावसाळ्यात या पक्ष्यांचा वावर असतो. हे पक्षी वर्षभर गात नाहीत तर फक्त पावसाळ्यातच गातात. सध्या या पक्ष्याचा ‘पी पिप पी पी’ असा सततचा मोठ्ठा आवाज ऐकायला मिळतो. जंगलात आवाज जरी सतत येत असला तरी लाजाळू स्वभावामुळे या पक्ष्याचे दर्शन होणे तसे दुर्लभच असते.
छोटी चोच, लाल डोळे, राखी रंगाची पाठ, उडताना दिसणारे पंखावरचे पांढरे ठिपके, लांब शेपटीवर आतील बाजूस पांढऱ्या पट्टय़ा तर बाहेरील बाजूवर पट्टय़ा नाहीत, असे याचे वर्णन करता येईल.
विविध प्रकारचे किडे, गांडुळे, सुरवंट हे कारुण्य कोकिळेचे आवडते खाद्य आहे. पतंगांच्या सुरवंटांचे खाजरे केस झाडाच्या खोडावर घासून स्वच्छ करून खाताना हे पक्षी अनेकदा दृष्टिक्षेपात येतात. इंग्रजीत याला ‘इंडियन प्लेंटीव कक्कू’ असे म्हणतात.