डोंबिवली : अमुदान कंपनीतील स्फोटानंतर राज्य सरकारने डोंबिवली एमआयडीसीतील ४५ रासायनिक कंपन्यांचा वीज, पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे या कंपन्यांतील व्यवहार ठप्प झाले असून येथील शेकडो कामगार बेरोजगार होण्याची चिन्हे आहेत. नोकरी टिकवण्यासाठी कामावर येणाऱ्या कामगारांना पिण्याचे पाणीही मिळेनासे झाले असून रसायनांच्या पिंपात साठवलेल्या पावसाच्या पाण्याचा वापर त्यांना करावा लागत आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर या भागातून घातक रासायनिक उद्याोग हद्दपार करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ४५ बंद कंपन्यांमध्ये सुमारे एकूण तीन ते साडे चार हजार (पान २ वर) (पान १ वरून) कामगार काम करत आहेत.या कंपन्यांचे वीज, पाणी तोडण्यात आल्यामुळे येथील कामकाजच ठप्प झाले आहे. मात्र, या कंपन्यांत काम करणाऱ्या कामगारांना दररोज हजेरी लावावी लागत आहे. कामावर हजर न राहिल्यास पगारकपातीची किंवा नोकरीच जाण्याची भीती असल्याने हे कामगार हजर रहात आहेत. मात्र, वीज आणि पाणी नसल्याने त्यांना प्राथमिक सुविधाही मिळेनाशा झाल्या आहेत.

पिण्यासाठी तसेच स्वच्छतागृहात वापरासाठी पाणी नसल्याने अनेक कंपन्यांत कामगार पावसाचे पाणी पिंपांत साठवून त्याचा वापर करत आहेत. हे पाणी साठवण्यासाठी रसायनांच्या रिकाम्या पिंपांचा वापर करण्यात येतो. रिकाम्या पिंपातील रसायने पाण्यात मिसळत असल्याने ते पाणी पिऊन कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार होऊ लागले आहेत. त्यातच पावसानेही ओढ दिल्याने स्वच्छतागृहांतही वापरण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी तेथे दुर्गंधी पसरली आहे.

पदवीधर निवडणुकीत मतदानानंतर मतपत्रिकेसह सेल्फी; भाजप महिला शहर अध्यक्षांचा प्रताप, छायाचित्र व्हायरल

महिलेला इजा

एमआयडीसीतील एका कंपनीच्या लेखा विभागात काम करणाऱ्या एका महिलेने स्वच्छतागृहासाठी पिंपात साठवलेले पाणी समजून चुकून रसायनाचा वापर केला. त्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली. कंपनी प्रशासनाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी कंपनीचे भागीदार किर्ती शहा यांनी औद्याोगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या संचालकांना पत्र पाठवून या गंभीर घटनेची माहिती दिली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात तक्राही करण्यात आली आहे. अशा घटना घडल्यानंतर आता मानपाडा पोलीसह खूप त्रास देत असल्याच्या तक्रारी काही उद्याोजकांनी केल्या.

४५ रासायनिक कंपन्यांचा वीज, पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने तेथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बंद कंपन्यांमुळे कामगार, अधिकाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.- देवेन सोनी, उद्याोजक