गर्द वृक्षवल्लीने सजलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेला येऊर परिसर हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही पक्षांच्या किलबिलाटाने अधिक गजबजलेला असतो. जीवसृष्टीला मिळालेल्या नवचैतन्यामुळे पावसाळ्यात या पक्ष्यांचे दर्शन घेणे अधिकच नयनरम्य असते. इतर भागातून स्थलांतरित होऊन येणारे पक्षी, त्याचबरोबर याच भागामध्ये राहणाऱ्या पक्ष्यांची नव्याने ओळख करून घ्यायची असेल तर येऊरच्या जंगलात नक्कीच भेट देता येऊ शकते.
जॅकोबिन कुकू
वैशिष्टय़ : जॅकोबिन कुकू हा कोकीळ पक्ष्याच्या जातीत मोडणारा पक्षी आफ्रिका आणि आशिया खंडात आढळतो. पावसाची चाहूल लागताच हा पक्षी भारतात आपले स्थलांतर करतो. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी जॅकोबिन कुकू हा पक्षी येऊरच्या जंगलात हजेरी लावतो. जॅकोबिन कुकू जंगलात दाखल झाल्यावर साधारण दुसऱ्या आठवडय़ात पाऊस पडतो, असा समज आहे. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो, असे म्हटले जाते त्याचप्रमाणे जॅकोबिन कुकू हा पक्षीदेखील पावसाची वाट पाहत असतो. पिऊ-पिऊ असा आवाज हे पक्षी काढतात. प्रजननाच्या काळात हे पक्षी अतिशय प्रभावी आवाज काढतात.
मलबार व्हिसलिंग थ्रश
वैशिष्टय़ : मंजूळ आवाजासाठी मलाबार व्हिसलिंग थ्रश या पक्ष्याला व्हिस्टलिंग स्कूलबॉय असेही संबोधतात. गाणाऱ्या पक्ष्यांच्या जातीमध्ये मलाबार व्हिस्टलिंग थ्रश या पक्ष्याचा समावेश होतो. हुबेहूब एखाद्या व्यक्तीच्या शीळ वाजवण्यासारखा हा पक्षी आवाज काढतो. पूर्व आणि पश्चिम घाटात हा पक्षी वास्तव्यास असतो. या पक्ष्याच्या कपाळ आणि खांद्याचा काही भाग काळा आणि निळा रंगाचा असतो. या पक्ष्याचे पाय आणि चोचीचा रंग काळा असतो. सारख्या दिसण्यामुळे नर आणि मादी यांच्यातील फरक कळत नाही. ओरिसाच्या काही भागातही या पक्ष्याचे वास्तव्य आढळते. घनदाट जंगलाचे आकर्षण असलेला हा पक्षी येऊरच्या जंगलातही पावसाळ्यात येत असतो. किडे, बेडूक, गांडूळ असे या पक्ष्याचे जंगलातील खाणे आहे. पावसाळ्यात येऊरच्या जंगलातील जैवविविधता अधिक बहरत असल्याने या पक्ष्याला जंगल पोषक ठरते. साधारण नर आणि मादी एकत्र पाहायला मिळतात. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी हे पक्षी आपले शरीर सतत पाण्यात ओले करतात. जून ते सप्टेंबर या काळात हा पक्षी येऊरमध्ये दृष्टीस पडतो.
इंडियन पिटा
वैशिष्टय़ : विविध नऊ रंगांत आढळणारा हा पक्षी दिसायला अतिशय आकर्षक असतो. भारतात हिमालयाच्या जंगलात वास्तव्यास असलेला इंडियन पिटा पावसाळा सुरूझाल्यावर येऊरच्या जंगलात दाखल होतो. सर्वसाधारण पक्षी झाडावर आढळतात. मात्र इंडियन पिटा पक्षी जंगलात जमिनीवरील कीटक हे आपले खाद्य शोधताना आढळतो. अतिशय रंगीबेरंगी असणारा हा पक्षी नऊ रंगांत आढळत असल्याने भारतीय भाषेत या पक्ष्याला नवरंग किंवा नवरंगी असे संबोधतात. सकाळी सहा आणि सायंकाळी सहा वाजता इंडियन पिटा हा पक्षी अधिक बोलका असतो. मे महिन्यात अधिक आवाज काढणारा हा पक्षी जुलै महिन्यात मात्र अतिशय शांत असतो.
कुठे वास्तव्य : हिमालयाचे जंगल, महाराष्ट्रात कोकण पट्टा, पश्चिम घाटात हा पक्षी आढळतो.
सर्व छायाचित्रे: आदित्य सालेकर, सीमा हर्डिकर आणि पराग शिंदे.