मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर होते. संघटनेची बांधणी आणि आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी हा दौरा काढला होता. या दौऱ्यात त्यांनी एका पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केले होते. यावेळी टोलनाका या विषयावरही त्यांनी विस्तृत अशी भूमिका मांडली. “माझा विरोध टोलनाक्याला नसून तिथे होणाऱ्या टोल वसुलीला आहे”, असा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला. दौरा पूर्ण करून मुंबईकडे जात असताना राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा ठाणे – मुलुंड टोलनाक्यावर वाहतूक कोंडीत अडकलेली वाहने सोडविली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतायत”, ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “त्यांना पैसे…”

राज ठाकरे यांनी ७ जानेवारी रोजी अशाचप्रकारे खालापूर टोलनाक्यावरही वाहतूक कोंडी सोडविली होती. पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे येत असताना राज ठाकरेंनी टोलनाक्याच्या गर्दीत अडकलेली रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी थेट टोलनाक्यावर धडक दिली आणि सर्व वाहनांना रस्ता मोकळा करून दिला होता. अशाच घटनेची पुनरावृत्ती आज पुन्हा ठाणे – मुलुंड टोलनाक्यावर पाहायला मिळाली. राज ठाकरे स्वतः गाडीतून टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी या घटनेचा व्हिडिओ एक्स अकाऊंटवर शेअर करत माहिती दिली. “आज नाशिक दौरा आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्राफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे नेहमीप्रमाणे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता करुन दिला. ठाकरे शैलीत सज्जड दम देऊन त्यांनी ट्राफीकचा प्रश्न काही क्षणात सोडवला..”, असे कॅप्शन गजानन काळे यांनी लिहिले आहे.

“भाजपाला भविष्यात ईडीचं राजकारण…”, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा; म्हणाले…

टोलला विरोध नाही, टोलवसुलीला विरोध

दरम्यान आज दुपारी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोलनाका या विषयावर सविस्तर भूमिका मांडली होती. ते म्हणाले, “माझा टोलला विरोध नाही. पण टोलवर जी रोकड जमा होते, त्याला विरोध आहे. टोलमधून किती गाड्या गेल्या, किती टोल वसूल झाला, त्यातून सरकारला किती पैसा गेला आणि कंत्राटदाराच्या खिशात किती पैसे गेले? याच्यात कोणतीही पारदर्शकता नाही. जगभरात टोल आहे. पण आपल्याकडे विषय टोलवसुलीचा आहे. मुंबई-पुणे महामार्गावर गेले कित्येक वर्ष टोल वसूल केला जात आहे, या वर्षात अद्याप पैसे वसूल झाले की नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

कंत्राटदार माझ्याकडे ऑफर घेऊन आले, पण..

टोलनाक्यावर जमा होणारा पैसा हा कंत्राटदाराच्या खिशात जातो. कंत्राटदाराकडून तो राजकीय पक्षांच्या फंडात जातो, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. यावेळी पत्रकारांनी हे कोणते पक्ष आहेत? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, अनेक पक्ष आहेत. वेळ आल्यानंतर त्यांची नावे उघड करेन. माझ्याकडेही कंत्राटदारांकडून ऑफर घेऊन आले होते. पण त्यांना सज्जड दम दिला. तुम्हाला इतका चोप देईन की, पुन्हा टोलनाक्यावर जाता येणार नाही, अशी तंबी दिल्यावर ते माझ्याकडे पुन्हा आले नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray angry at thane mulund toll plaza over traffice jam video viral kvg
Show comments