राज ठाकरे यांची कडोंमपा आयुक्तांना सूचना

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सुटसुटीत असावा, यासाठी रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटविण्यासाठी जातीने लक्ष घाला. दुय्यम दुर्जाच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवू नका, अशी सूचना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना केली.

शहरे स्वच्छ, सुंदर दिसण्यासाठी ही सफाई हवी. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील पालिका आणि रेल्वेची हद्द निश्चित करून संबंधित विभागांवर फेरीवाले हटविण्याची जबाबदारी सोपवावी. असे झाल्यास फेरीवाल्यांचा बंदोबस्त करणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला सोपे जाईल, असा दावा राज यांनी केला. असे झाल्यास एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार घडणार नाहीत. या सगळ्या नियोजनाचे चांगले परिणाम दिसून येतील, असे ते म्हणाले. २७ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत.

या गावांच्या विकासासाठी शासनाने विकास कामांसाठी काही निधी उपलब्ध करून दिला आहे की नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. महापालिकेने हा निधी मिळविण्यासाठी पत्रव्यवहार केला की नाही, असे प्रश्न राज यांनी आयुक्त वेलरासू यांना केले.

‘भूमाफियांना रोखा’ 

मनसे नगरसेवकांनी यावेळी केडीएमटीची दुरवस्था, बालभवनमधील वाचनालयाचा प्रश्न, पालिकेचे भूमाफियांकडून गिळंकृत होत असलेले आरक्षित भूखंड, प्रभागांमधील नागरी समस्या या विषयावर आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी या प्रश्नांची योग्य ती दखल घेण्यात येईल, असे आश्वासन राज यांना दिले. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस प्रमोद पाटील, नगरसेवक मंदार हळबे, उपाध्यक्ष राजेश कदम, शहरप्रमुख मनोज घरत पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader