मनसेचा वर्धापन दिन हा ९ मार्चला आयोजित केला जातो. हा वर्धापनदिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार असल्याचे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, राज ठाकरे हे वर्धापन दिनानिमित्ताने ठाण्यात येणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली होती. त्यावेळी मशीदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात मनसेने भोंग्यावरून आंदोलन केले होते. हे प्रकरण देशभर गाजले होते. सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता आहे. मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत. त्यामुळे, या वर्धापनदिनानिमित्ताने राज ठाकरे कोणती भूमिका घेतात. याकडे मनसेच्या नेत्यांसह सर्वांचे लक्ष लागून आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा वर्धापन दिन साजरा होणार असल्याने मनसेच्या ठाण्यातील नेत्यांनी आता तयारीला सुरुवात केली आहे. ‘संघर्षाची तयारी… पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एक सभा घेतली होती. ही सभा गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील चौकात झाली होती. या सभेमध्ये ठाणे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंग्यांसदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर अनेक मशीदींवरील भोंगे त्यावेळी उतरविले गेले होते.
हेही वाचा – राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १२८ कोटींची ४९ हजार प्रकरणे निकाली
सध्या राज्यात सत्ताबदल झाले असून, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आहेत. त्यामुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्धापनदिनानिमित्ताने सत्ताधाऱ्यांबद्दल काय भूमिका घेतात, याकडे मनसेच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे.