ठाणे : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागताच स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करत कार्यकर्त्यांच्या शिडात उत्साहाचे बळ फुंकण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी झालेली ठाण्याची धावती भेट मात्र येथील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी मात्र हिरमोड करणारी ठरली. राज येणार या बातमीमुळे उत्साहात असणाऱ्या ‘मनसे’च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली होती. मात्र एका फुड ब्लाॅगरसोबत पाचपाखाडी येथील ‘प्रशांत काॅनर्र’ला भेट देऊन पुढे मामलेदार मिसळीचा अस्वाद घेत राज यांनी मुंबईची वाट धरल्याने कार्यकर्त्यांची मने मात्र ‘कडू’ झाली.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत राज यांनी यापूर्वीच दिले आहेत. ठाणे विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव रिंगणात असण्याची शक्यता असून पाच वर्षांपूर्वी जाधव यांनी चांगली लढत दिली होती. या विधानसभा क्षेत्रात राज येणार अशी बातमी मनसे कार्यकर्त्यांपर्यंत गुरुवारी सायंकाळी पोहोचविण्यात आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण होते. राज यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच ठाणे, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, कळवा-मुंब्रा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने टोलनाक्यावर जमले होते. मनसेने टोल माफीसाठी अनेक आंदोलन केली होती. त्यामुळे राज ठाकरे टोलनाक्यावर येताच त्यांचे स्वागत फटाके फोडून करण्यात आले. राज ठाकरे यावेळी वाहनातून आणि त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारला. पुन्हा वाहनात बसून ठाण्यातील मामलेदार या त्यांच्या आवडत्या मिसळ उपाहारगृहाच्या दिशेने रवाना झाले.
हेही वाचा – माजी खासदार नवनीत राणा राज्यसभेवर जाणार?
मिसळीवर मुलाखत…
राज ठाकरे मिसळीचा अस्वाद घेण्यासाठी येणार याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांची तारांबळ उडाली. काही वेळेतच ठाणेनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त उपाहारगृह परिसरात तैनात करण्यात आला. संबंधित उपाहारगृहाबाहेर कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राज ठाकरे येण्यापूर्वीच जमले होते. साहेब आल्यावर आपल्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय आदेश देणार याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. उपाहारगृहात मात्र कोणालाही सोडले जात नव्हते. सकाळी साडेअकरानंतर राज ठाकरे आले आणि त्यांनी थेट उपाहारगृहात प्रवेश केला. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंब होते तसेच अविनाश जाधव आणि प्रसिद्ध फुड ब्लाॅगर कुणाल विजयकर हेदेखील होते. याठिकाणी विजयकर यांच्यासोबत राज यांची खाद्य पदार्थांवर मुलाखत सुरु झाली. ती तब्बल तासभर चालली. या काळात कार्यकर्ते उपहारगृहाबाहेर त्यांची वाट पहात होते.
हेही वाचा – निवडणूक काळात चक्राकार गतीने फिरणारे जोरगेवार!
पीडितेसोबत संवाद, कार्यकर्ते तिष्ठतच
याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. हे प्रकरण अविनाश जाधव यांनी लावून धरले आहे. राज यांची भेट घेण्यासाठी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची ठाणेनगर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झाली होती. राज तेथे येतील या आशेवर काही पदाधिकारी त्यांना देण्यासाठी निवेदनही घेऊन आले होते. परंतु राज ठाकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांना थेट उपाहारगृहात बोलावले आणि संवाद साधला. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांचा राज ठाकरे यांच्या पोलीस ठाण्यात भेट घेण्याची आशा देखील संपली. त्यानंतर राज ठाकरे हे पाचपाखाडी येथील ‘प्रशांत काॅर्नर’ या मिठाईच्या दुकानाकडे निघाले. तेथेही विजयकर यांच्यासोबत वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर त्यांनी मुलाखत दिली आणि काही पदार्थ चाखले देखील. या काळात आपल्यासोबत निवडणुकीसंबंधी संवाद होईल या आशेवर अनेक कार्यकर्ते राज जातील तेथे त्यांच्या मागून फिरत होते. मात्र ही चवदार मुलाखत संपली आणि राज तेथून कार्यकर्त्यांना हात दाखवून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यासंदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.