टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी उपस्थिती लावली. त्यावेळी मंदिरामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘आया है राजा’ अशी मराठी गिते लावून त्यांचे जैन समाजाने स्वागत केले. अखंड भारत हे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि ते राज ठाकरे यांनी साकार करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे सांगत जैन धर्मगुरू यांनी राज यांचे कौतुक केले.
ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय असून येथून आता बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कामकाज चालते. त्यामुळे टेंभीनाका परिसर हा संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून, या भागात समाजाचे मोठे मंदीर आहे. या मंदिरामध्ये जैन समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी ८ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीती लावली. त्यांच्या स्वागतासाठी जैन समाज मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित होता. समाज बांधवांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. राज यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर ते मंदिरामधील सभा मंडपातील कार्यक्रमस्थळी आले. तिथे त्यांचे जैन समाजाने स्वागत केले.
हेही वाचा – ठाणे : डोंबिवलीत सराफाचे दुकान लुटण्याचा प्रयत्न
राज ठाकरे यांच्याकडून आमची एक अपेक्षा आहे. ही अपेक्षा छोटी नाहीतर खूप मोठी आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि भारताबद्दल बोलत नाही तर अखंड भारत हे आमचे स्वप्न आहे. कश्मीर अर्धा आपल्या ताब्यात आला आहे. आम्हाला पूर्ण कश्मीर हवा आहेच, त्याचबरोबर पाकिस्तानही हवा आहे. अखंड भारत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते. हे स्वप्न तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी आता आम्ही तुमचे स्वागतही केले आहे, असे जैन धर्मगुरू आचार्य चितानंद महाराज यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.