महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ठाण्यात आयोजित कार्यक्रमात गुरुवारी (९ मार्च) जोरदार टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणारा मनसे पहिला पक्ष असल्याचं सांगितलं. तसेच अनेकांना ब्लू प्रिंटमध्ये काय आहे हेही माहिती नसल्याचं सांगताना त्यांनी खोचक टोले लगावले. हे सांगताना त्यांनी एका पत्रकार परिषदेचं उदाहरण दिलं.
राज ठाकरे म्हणाले, “एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मला विचारलं होतं की, ‘तुमची ब्लू फिल्म आलीय ती…’. मी म्हटलं सालं ती काढली असती तर बरं झालं असतं, यांनी किमान बघितली तरी असती. ब्लू प्रिंट काढलीय, कुणी बघितलीच नाही.”
“ब्लू प्रिंट येण्याआधी सगळे मला विचारायचे की, तुमची ब्लू प्रिंट कुठं आहे. ज्या दिवशी ब्लू प्रिंट जाहीर केली तेव्हापासून आजपर्यंत मला त्यावर प्रश्न विचारलेला नाही. कारण स्वतः काही वाचलेलं नाही. पाहिला दिली असती, तर पाहिली असती. ब्लू प्रिंटवर कुणीही प्रश्न विचारत नाही,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “…तर मला कुणी घरात घेईल का?”, राज ठाकरेंचा मनसैनिकांना सवाल
संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तेव्हा संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यावरून राज ठाकरेंनी इशारा दिला आहे. माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊन देणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, “संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं, कोणी केलं? पण, एक निश्चित सांगतो, ज्यांनी केलं, त्यांना पहिलं समजेल हे त्यांनी केलं आहे. मग, सगळ्यांना समजेल हे त्यांनी केलं आहे. मात्र, माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊन देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाही.”
हेही वाचा : “मनसेच्या वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!
“अनेक पत्रकार पक्षांना बांधले आहेत. ते त्यांना प्रश्न विचार नाहीत. तसेच, राजू पाटील एकटे विधानसभेत पक्षाची भूमिका मांडत आहेत. ‘एक ही है लेकीन काफी है’,” असं म्हणत राज ठाकरेंनी राजू पाटील यांचं कौतुक केलं आहे.