संपूर्ण महाराष्ट्रात आज गोकुल आष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. विविध राजकीय नेत्यांकडून ठिकठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमांना विविध बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व गोविंदाना दक्षता घेऊन सण साजरा करण्याच्या सूचना दिल्या.
“दहीहंडी सणावर अनेकदा न्यायालयाकडून बंदी आणण्याचा प्रयत्न झाला, पण मी ठामपणे उभा राहिलो”, अशी आठवणही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी सांगितली. गोविंदांना उद्देशून केलेल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, “सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सण साजरे करा.या सणांवर अनेकदा बंदी आणायचे प्रयत्न झाले, परंतु मी ठामपणे उभा राहिलो. न्यायालयाकडून बंदी आणण्याचे प्रयत्न झाले. तेव्हा मी सांगितलं होतं, कोणत्याही परिस्थितीत आमची दहीहंडी होणार म्हणजे होणार… न्यायालयाला जी कारवाई करायची आहे, ती माझ्यावर करावी.”
हेही वाचा- “एकनाथ शिंदे म्हणजे सात दिवस न झोपलेली व्यक्ती”; भाजपा आमदाराचं विधान, म्हणाले, “ते एक-दोन तासही…”
प्रत्येकवेळी आपल्या हिंदू आणि मराठी सणांवरच हे बंधणं आणत राहतील, हे माझ्याकडून सहन होणार नाही. तुमच्याकडूनही सहन होणार नाही. पण आपण आपले सगळे सण नीट आणि उत्साहात पार पाडू. कुणाला कसलाही त्रास होणार नाही, याची दक्षता आपण सर्वजण घ्याल, अशी मी आशा बाळगतो, असंही राज ठाकरे म्हणाले.