कल्याण : कल्याण लोकसभेचे शिवसेेनेचे उमेदवार खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालावर महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या यादीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची छबी झळकू लागल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य तर राजकीय पटलावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांच्या कार्यअहवालाचे रविवारी संध्याकाळी पाच वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यअहवालाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावे झळकली आहेत. या यादीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याने महायुतीच्या उमेदवारांना प्रचार फलक, कार्य अहवालांवर राज ठाकरे यांची प्रतिमा छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कल्याण लोकसभेत मागील तीन वर्षापासून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे पिता-पुत्रांमध्ये विकास कामे, निधी, कामांचे श्रेय विषयांवरून शीतयुध्द सुरू होते. हे शीत युध्द राज ठाकरे यांनाही चांगले माहिती होते. या शीतयुध्दात कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विकासाच्या अनेक कामांंना खीळ बसली होती. आमदार राजू पाटील दर दिवसाआड शिंदे पिता-पुत्रांवर एक्स (टिवटर) च्या माध्यमातून टिकेची झोड उठत होते. या शीतयुध्दामुळे स्थानिक मनसे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यातही वितुष्ट आले होते. स्थानिक पातळीवर हे वितुष्टाचे चित्र आजही कल्याण ग्रामीण मतदारसंघ, दिवा, डोंबिवली, शहरी भागात दिसते.
हेही वाचा : आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे, म्हणाले, “पक्षातून दलालांची…”
अशा परिस्थितीत मनसेचे नेते महायुतीत दाखल झाले असले, राज ठाकरे यांनी मोदी यांना समर्थन दिले असले तरी आता मनसेच्या नेत्यांपेक्षा स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांना किती साथ देतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राज यांनी मोदी यांना पाठिंबा देताच मुंंबई, डोंबिवलीतील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मनसे नेत्यांनी मनसेच्या व्हाॅट्सप ग्रुपमधून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ही सगळी कुरबूर स्थानिक पातळीवर सुरू असताना खासदार शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची प्रतिमा झळकल्याने त्याचा फायदा खासदार शिंदे यांंना किती होणार याविषयी विविध प्रकारचे आखाडे राजकीय विश्लेषकांकडून बांधले जात आहेत.