लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना नेहमीच नाटकीय आंदोलन करण्याची सवय आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करण्यापेक्षा राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली तर ठाणेकरांचा टोल प्रश्न त्वरित मार्गी लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे टोल प्रश्नी आंदोलन होत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण अविनाश जाधव यांना एवढीच विनंती आहे की, मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करण्यापेक्षा राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले असते आणि टोल प्रश्नावर मार्ग काढला असता, हे अधिक चांगले झाले असते. भर उन्हातान्हात मनसैनिकांना उभे करुन हा प्रश्न सुटणार नाही, असेही परांजपे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा-ठाणे: टोल दरवाढविरोधात मनसेचे साखळी आंदोलन
गुजरात आणि मध्यप्रदेशामध्येही टोल आहेत. अविनाश जाधव यांना नेहमीच नाटकीय आंदोलन करण्याची सवय असते. यातुन मार्ग काढायचा असेल, ठाणेकरांचा प्रश्न सोडवायचा असेल तर शिवतीर्थावर सर्वच नेते राज ठाकरे यांना भेटत असतात. त्यांचे सर्वच नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी शिष्टमंडळासह या नेत्यांची भेट घेऊन मार्ग काढावा, असेही परांजपे यांनी म्हटले.