Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या ते महाराष्ट्रातील विविध शहरांचा दौरा करत आहेत. राज ठाकरेंनी ठाण्यात गेल्यानंतर मिसळ आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला. मामलेदारची मिसळ ही ठाण्यातली प्रसिद्ध मिसळ आहे. राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) आज ठाणे दौऱ्या दरम्यान त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह मिसळीचा आस्वाद घेतला.

ठाण्यातली मिसळ राज ठाकरेंची आवडती

ठाण्यातली मामलेदार मिसळ ही राज ठाकरेंची आवडती मिसळ आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) ठाणे दौऱ्यात आले तर ते मामलेदार मिसळीला भेट देऊन तिथली मिसळ खातात किंवा ठाण्यात जिथे असतील तिथे पार्सल तरी मागवतात. याआधीही ठाणे दौऱ्यादरम्यान मामलेदारची मिसळ खाल्ल्याचे किस्से आहेत. आज राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) शर्मिला ठाकरेंसह मामलेदार मिसळ खाल्ली. त्यांच्यासह अभिनेते आणि फूड व्ह्लॉगर कुणाल विजयकरही होते.

हे पण वाचा- विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो कसा? राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न

मामलेदार मिसळ ठाण्यात कशी आली?

नरसिंह मुर्डेश्वर हे गृहस्थ साधारण ७० वर्षांपूर्वी कारवारहून ठाण्यात आले. त्यांनी ५० चौरस मीटर जागेत खाऊचा एक ठेला सुरु केला होता. त्यात वडा, पुरी-भाजी, डोसे असे पदार्थ मिळत असत. इथे मिसळही मिळत असे. या मिसळीची चव लोकांना आवडली. त्यामुळे ठाण्यातली मिसळ म्हटली की मामलेदारची मिसळ हे समीकरण रुढ झालं. नरसिंह मुर्डेश्वर यांच्यानंतर लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी मामलेदार मिसळीची धुरा खांद्यावर पेलली आणि या व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या. याच ७० वर्षांहून जुन्या असलेल्या आणि ठाणेकरांसह अनेक खवय्यांना भुरळ पाडणाऱ्या मिसळीचा आस्वाद राज ठाकरेंनी घेतला. यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो प्रशांत कॉर्नर येथील पाणी पुरीकडे.

मिसळीचं नाव मामलेदार मिसळ का पडलं?

सुरुवातीला ही मिसळ ठाण्यातील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मिळत होती. तहसीलदाराला पूर्वी मामलेदार म्हटलं जात असे. यावरुनच मिसळीला मामलेदार नाव पडलं ते कायमचं. मामलेदार मिसळ खाण्यासाठी लोकांची रांग लागते. पार्सल न्या किंवा बसून खा आधी रांग लावावीच लागले. या मिसळीची चव हे या मिसळीचं वैशिष्ट्य आहे. मुर्डेश्वर यांच्या घरातील आजींनी हा मिसळीचा फॉर्म्युला शोधला आहे. ७० वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही मिसळीची चव कायम आहे.

Raj Thackeray Ate Pani Poori
राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या पाणी पुरीचाही आस्वाद घेतला. (फोटो RNO )

प्रशांत कॉर्नरला पाणी-पुरीचा आस्वाद

प्रशांत कॉर्नर हे ठाण्यातल्या पाचपाखाडी या ठिकाणी असलेलं प्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे. या ठिकाणच्या मिठाईची चव न्यारी असते. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी ठाणे दौऱ्या दरम्यान या ठिकाणी पाणी पुरी खाल्ली.

Story img Loader