ठाणे – विधानसभा निवडणूकीत एकाच मतदार संघातून आमने सामने उभे राहिलेले भाजपाचे आमदार संजय केळकर आणि शिवसेना (उबाठा) गटाचे नेते राजन विचारे हे चैत्र नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने अनेकांच्या भूवय्या उंचावल्या आहेत. ठाण्यातील जांभळी नाका परिसरात राजन विचारे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रौत्सवात भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी राजन विचारे तसेच उबाठा गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मनमोकळ्या गप्पा मारल्या. दरम्यान, या गप्पांमध्ये काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि इतर काही पक्षाचे मंडळी उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय केळकर आणि उबाठा गटाचे राजन विचारे यांच्यात लढत पाहायला मिळाली होती. उमेदवारांच्या नावाच्या घोषणेपासूनच या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे संजय केळकर, ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. लोकसभा निवडणूकीत राजन विचारे यांना उबाठा गटाने उमेदवारी दिली होती. परंतू, या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याकडून राजन विचारे यांचा तब्बल दीड ते दोन लाख मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर, राजन विचारे पुन्हा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते.
ठाणे शहर विधान सभा मतदार संघातून २००९ मध्ये राजन विचारे आमदार म्हणून निवडून आले असले तरी, हा सामना त्यांच्या साठी सोपा नव्हता. आमदार संजय केळकर हे गेले दोन टर्म या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे उमेदवार जाहीर झाल्यापासून या मतदार संघाच्या लढतीत चुरस पाहायला मिळत होती.
आमदार संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यावर राजन विचारे यांनी आक्षेप देखील घेतला होता. त्यामुळे केळकर यांचा अर्ज बाद होईल का असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला होता. परंतू, केळकर यांचा अर्ज बाद झाला नाही. या निवडणूकीत संजय केळकर यांना १ लाख २० हजार ४२४ मते मिळाली. तर, राजन विचारे यांना ६२ हजार १४१ मते आणि अविनाश जाधव यांना ४२ हजार ८०७ मते मिळाली. त्यामुळे या निवडणूकीत केळकर हे ५७ हजार २२८ मताधिक्य घेत विजयी झाले. विधानसभा निवडणूकीत एकाच मतदार संघातून आमने सामने आलेले राजन विचारे आणि संजय केळकर हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
समाजमाध्यमांवर छायाचित्र..
राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्रौत्सवात आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती लावली. याचे छायाचित्र राजन विचारे यांच्या समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले आहे. या छायाचित्रांमध्ये संजय केळकर आणि राजन विचारे गप्पा मारताना दिसून येत आहेत. तसेच संजय केळकर यांनी उबाठा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह देखील संवाद साधला. यावेळी त्याठिकाणी महाविकास आघाडीतील इतर पक्षाचे नेते मंडळी देखील उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.