ठाणे : काश्मीरमधील दहशदवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नवी मुंबईत शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक फोडण्यात व्यस्त होते, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यांनी केला.

ठाण्यातील चिंतामणी चौकात ठाकरे गटाने दहशदवादी हल्ल्याविरोधात आंदोलन केले. आंदोलनात पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे बोलत होते. विचारे म्हणाले की, एखादा पक्ष कसा संपवायचा, एखाद्या कार्यकर्त्याला कसा एका पक्षातून त्यांच्या पक्षात आणायचे इतकेच काम येते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नवी मुंबईत शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक फोडण्यात व्यस्त होते. याची चीड येत आहे. यांनी राजीनामा द्यायला हवा असे विचारे म्हणाले.

पहेलगाम हे एक पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळावर दोन ते तीन हजार नागरिक होते. असे असताना येथे साधा पोलीस बंदोबस्तही नव्हता. या भागात सैन्यदल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) जवान असतात. असे असूनही येथे पाच अतिरेकी येतात आणि बेछूट गोळीबार करतात. हा सर्व प्रकार एक तास सुरु होता. २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर देखील असाच हल्ला झाला होता.

२०१९ मध्ये पूलवामा हल्ला झाला होता. त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या होत्या असे राजन विचारे म्हणाले. आता अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. हिंदूत्त्वाचे सरकार असल्याचे ते लोक म्हणत आहेत. पण आज कोणीही सुरक्षित नाही. अशा पद्धतीने भ्याड हल्ला यात्रेकरुंवर होत आहे. तेथील अवस्था भयावह आहे असेही ते म्हणाले. जनता त्रस्त झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात गँगस्टर फिरत आहेत असाही आरोप त्यांनी केला.