मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर शहरात अखेर नव्या शहरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर यांची उल्हासनगर कॅम्प एक ते तीनसाठी शहरप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. तर मराठीबहुल भाग असलेल्या कॅम्प चार आणि पाचसाठी मराठमोळा चेहरा असलेल्या रमेश चव्हाण यांनी निवड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी या निवडी महत्वाच्या मानल्या जातात.
हेही वाचा- ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ काही तासांसाठी बंद
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात केलेल्या बंडानंतर त्यांच्या ठाणे जिल्ह्यात खुद्द त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात आधी त्यांना विरोध झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर शहरात असलेल्या खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. त्यानंतर शहरातील बहुतांश शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यातही शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे यांनी मात्र शिंदेपासून अंतर राखले. शहरातील बहुतांश नगरसेवकांनी पाठिंबा दिला असला तरी शहरप्रमुख आणि प्रमुख ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला नसल्याने शहरात शिंदे गटाचे नेतृत्व कुणाच्या हाती जाईल, अशी चर्चा होती. यात माजी महापौर लिलाबाई आशान यांचे पुत्र अरूण आशान, कलवंतसिंग सहोता आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर यांच्या नावाची चर्चा होती.
हेही वाचा- ठाणे जिल्ह्यातील दुर्बल घटकांच्या घरांसाठी रमाई आवास योजनेतून दोन कोटीचा निधी
अखेर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कॅम्प एक ते कॅम्प तीन या भागासाठी राजेंद्रसिंह भुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अंबरनाथ आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या आणि मराठीबहुल परिसर असलेल्या कॅम्प चार आणि पाच या भागासाठी मराठी चेहरा असलेल्या रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती भुल्लर यांनी दिली आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दोन शहरप्रमुख असणार आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत सिंधी, पंजाबी बहुल भागात भुल्लर तर मराठीबहुल भागात चव्हाण यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जातील हे आता स्पष्ट झाले आहे.
त्यांना शिंदे गटाचे दरवाजे बंद ?
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उल्हासनगरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी ठाकरे गटात राहणे पसंत केले. चार महिन्यांनंतर शहरप्रमुख नेमल्याने या ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्यांची प्रतिक्षा केली जात होती का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.आता या नेमणुकांनंतर उरलेल्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाने दरवाजे बंद केले का असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मात्र या दोघांच्या नेमणुकीचा बाळासाहेबांच्या शिवसेनेला कसा फायदा होतो, हे पााहणे आता उत्सुकतेचे राहणार आहे.