अंबरनाथ: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे एका अपघातात तोल गेल्याने गटारात पडले. यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे अंबरनाथ शहरात होते. अंबरनाथ शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, शाळा आणि शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी अंबरनाथ पश्चिमेतील क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर आमदार राजेश मोरे सर्वसमावेत निघत होते. त्यावेळी एक गटार ओलांडताना राजेश मोरे यांचा तोल गेला. तोल गेल्याने मोरे हे लहानशा गटारात पडले. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. त्यांना सुरुवातीला डोंबिवली आणि नंतर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कोण आहेत राजेश मोरे
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन एकमेव आमदार राजू पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. राज्यात २०२४ विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांची जागा निवडून येणार अशी सर्वांना खात्री होती. मात्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी इथे स्वतः प्रचाराची सूत्रे हाती घेत विजय खेचून आणला असे बोलले जाते. त्यामुळे राजेश मोरे जायंट किलर ठरले होते. मोरे यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक होते.