राजहंस फाऊंडेशन
सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या संगोपनाची गरज असणाऱ्या स्वमग्न मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन राजहंस फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून स्वमग्नांविषयी जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जातात. गेल्या सोमवारी जागतिक स्वमग्न दिनानिमित्त विवियाना मॉलमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने या संस्थेचा परिचय करून देणारा लेख..
धावपळ आणि स्पर्धेच्या युगात धडधाकट मुला-मुलींचे संगोपन, त्यांचे शिक्षण, करिअर या गोष्टीच जिथे आव्हानात्मक आहेत, तिथे विशेष मुलांचा सांभाळ हे पालकांपुढे एक मोठे आव्हान असते. त्या मुलांच्या काळजीने पालकांचे सारे जगणेच झाकोळून जाते. मात्र कोणत्याही समस्येला एकटय़ाने सामोरे जाण्यापेक्षा एकत्र येऊन प्रयत्न केले तर मार्ग सोपे होतात. ठाण्यात विशेष मुलांच्या पालकांच्या अनेक समूह संस्था आहेत. त्यातील एक म्हणजे राजहंस फाऊंडेशन. स्वमग्न म्हणजेच ‘ऑडिझम’ची समस्या भेडसाविणाऱ्या मुलांच्या पालकांनी या संस्थेची स्थापना केली आहे. दरवर्षी २ एप्रिल रोजी जागतिक स्वमग्न दिन पाळला जातो. त्यानिमित्ताने स्वमग्न मुलांचे प्रश्न, त्यांचे भावविश्व याविषयी चर्चा केली जाते.
ठाण्यातही राजहंस फाऊंडेशनच्या सहकार्याने विवियाना मॉलमध्ये स्वमग्न मुलांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनीषा सीलम यांनी पाच वर्षांपूर्वी स्वमग्न मुलांच्या पालकांनी एकत्र यावे म्हणून फेसबुक पेज तयार केले. त्याआधारे अनेक स्वमग्न मुलांचे पालक त्यांच्या संपर्कात आले. प्रत्येक कुटुंबाची कथा आणि व्यथा सर्वसाधारणपणे सारखीच होती. स्वमग्न मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या थेरपी ठाण्यात उपलब्ध नव्हत्या. त्यांना मुंबईत घेऊन जाणे सर्वानाच परवडणारे नव्हते. काही पालकांकडे तेवढा वेळ नव्हता. फेसबुक पेज आणि त्यानंतर स्थापन झालेल्या व्हॉटस् अॅप ग्रुपने या संदर्भातील अनुभवाचे बोल इच्छुकांना उपयोगी ठरू लागले.
त्यानंतर नियमितपणे कार्यशाळा आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्यात पालकांना तज्ज्ञांमार्फत अचूक मार्गदर्शन दिले जाऊ लागले. त्यामुळे पालकांची अकारण फरफट थांबली. अनेकदा या संदर्भात पालकांना नीट माहिती नसल्याने त्यांची फसवणूक व्हायची. ते प्रकार कमी झाले. अनुभवी पालकांकडून दिलासा मिळू लागला. कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षण तसेच स्वमग्नांविषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. त्यानंतर राजहंस फाऊंडेशन या संस्थेची रीतसर स्थापना करण्यात आली. त्या संस्थेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्वमग्न मुलांना सतत कुणाचा तरी आधार लागतो. ती मुले आत्मकेंद्री असल्याने चटकन कुणाशीही संवाद साधू शकत नाहीत. पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडून शहरात सर्वेक्षण करून स्वमग्न मुलांची सविस्तर नोंद करण्यात आली. ठाणे शहरातील ७५ मुले-मुली या सर्वेक्षणात समोर आली.
तीन हात नाक्याजवळ राजहंस फाऊंडेशनचे स्वत:चे कार्यालय आहे. तिथे स्वमग्न मुलांसाठी निरनिराळे व्यवसाय प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. त्यात हस्तकला, चॉकलेट तयार करणे, डेटा एन्ट्री, संगणक प्रशिक्षण इत्यादी उपक्रम राबविले जातात.
यापूर्वी स्वमग्न मुलांसाठी ठाण्यात कोणत्याही सुविधा नव्हत्या. मात्र आता राजहंस फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधांचा पाठपुरावा केला जात आहे. मुले एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम करतात. स्वमग्न मुलांसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलद्वारे (‘एनआयएस’) शालेय परीक्षा घेतल्या जातात. आठवी ते बारावीच्या परीक्षा आता राजहंस फाऊंडेशनमध्ये घेतल्या जातात. सर्वसाधारण अभ्यासक्रमातील कोणतेही दोन विषय घेऊन या मुलांना परीक्षा देता येते. काही थेरपीस्ट नियमित केंद्रात येतात. नियमितपणे तज्ज्ञांची व्याख्यानेही होतात.
‘स्वमग्न’ मुले आत्मकेंद्री असली तरी हुशार असतात. एखाद्या विषयात त्यांना विशेष गती असते. प्रोत्साहन, प्रेम आणि प्रशिक्षणाने त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होते. त्यांना फक्त सतत कुणाच्या तरी आधाराची, मदतीची गरज असते. ‘राजहंस’ने त्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
पत्ता- राजहंस फाऊंडेशन, ३ रो हाऊस, लोकसिटी टॉवर सोसायटी, फिरके हायस्कूल शेजारी, तीन हात नाका, ठाणे (प.) संपर्क- ९९२०५७९९२३.