दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आलेल्या स्वमग्न मुलांच्या पालकांनी एकत्र येत राजहंस फाऊंडेशनची स्थापना केली आहे. अलिकडेच संस्थेने वसंतविहार येथे या मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे..

सरसकट सर्वच भिन्नमती मुलांना विशेष मुले म्हटले जात असले तरी त्यातील प्रत्येकाचे प्रश्न आणि गरजा वेगवेगळ्या असतात. ज्या आई-वडिलांच्या पोटी अशी मुले जन्म घेतात, त्यांचे पुढील सारे जीवनच बदलून जाते. अशा मुलांची देखभाल आणि संगोपन करण्यातच त्यांचे सारे आयुष्य खर्ची पडते. मुंबई-ठाणे परिसरात काही गतीमंद, मतिमंद आणि बहुविकलांग मुलांच्या पालकांनी संस्था स्थापन करून त्यातून सामूहिकपणे मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे जन्मत:च स्वमग्न ( ऑटिझम ) असणाऱ्या ठाण्यातील मुलांच्या पालकांनी गेल्या वर्षी राजहंस फाऊंडेशनची स्थापना केली. गेल्या आठवडय़ात वसंत विहारमध्ये एका भाडय़ाच्या जागेत फाऊंडेशनने आपले छोटे व्यवसाय केंद्र सुरू केले. ठाणे शहरात स्वतंत्र, अद्ययावत व्यवसाय केंद्र स्थापन करणे हे या समूहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध सोशल माध्यमांचा आता ठिकठिकाणी राबविल्या जात असलेल्या सामाजिक उपक्रमांना खूपच उपयोग होत आहे. त्यातून निरनिराळे स्व-मदत गट एकत्र येत आहेत. राजहंस समूहही अशाच प्रकारे एकत्र आला. ठाण्यातील मनीषा सीलम यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्यासारख्या स्वमग्न मुलांच्या पालकांशी संवाद साधण्याच्या हेतूने फेसबुकवर ‘तो राजहंस एक’ नावाचे पान सुरू केले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सोहम हा त्यांचा मुलगा स्वमग्न आहे. प्रत्येक स्वमग्न मुल हे वेगळे असते. त्यातील काही अत्यंत हुशार, मनस्वी असतात. मात्र ती मुले आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांना सतत कुणाच्यातरी मदतीची गरज असते. सहाजिकच पालकांना अशा मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. सुरूवातीच्या काळात पालक मुलांवरील या दोषांवर उपाय शोधत राहतात. त्यात पैसे तर खर्च होतातच, शिवाय फसवणूकही होण्याची शक्यता असते. मदत गटामुळे स्वमग्न मुलांच्या पालकांना मोठा आधार मिळाला. ज्यांची मुले मोठी आहेत, ते नव्या पालकांना मार्गदर्शन करू लागले. अनुभवांच्या या आदानप्रदानातून योग्य माहिती मिळू लागली.

फेसबुकवरील या ग्रुपमुळे स्वमग्नतेविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली. राज्यभरातील पालक, थेरेपीस्ट त्यामाध्यमातून जोडले गेले. फेसबुकवरील या समूहाद्वारे हजारएक व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्या. त्यानंतर ठाण्यातील काही पालकांनी एकत्र येत राजहंस फाऊंडेशन नावाने संस्थेची नोंदणी केली. गेल्या वर्षभरात या संस्थेच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी चार कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यात त्यांना कागदी पिशव्या, चॉकलेटस्, निरनिराळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सध्या तात्पुरत्या स्वरूपात वसंतविहारमध्ये संस्थेने एक जागा भाडय़ाने घेतली आहे. तिथे सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत सध्या मुले-पालक एकमेकांना भेटतात. लवकरच ११ ते ४ यावेळेत हे केंद्र सुरू राहणार आहे. अशा मुलांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे म्हणून पालकांनी केलेला हा छोटा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण शिबीर तसेच थेरेपीसाठी महापालिका प्रशासनाने ठाणे शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी फाऊंडेशनची मागणी आहे. शहरातील महापालिकेच्या अनेक वास्तू पडून आहेत. पटसंख्या कमी झाल्याने पालिका शाळांचे वर्ग रिकामे आहेत. तेथील किमान दोन वर्ग फाऊंडेशनला दिले तरी सोय होऊ शकेल, असे आवाहन मनीषा सीलम यांनी केले आहे.

संपर्क-९९२०५७९९२३.