डोंबिवली – भाजपचे कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांना गुरुवारी मानपाडा पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केल्याच्या विषयावरून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील संतप्त झाले आहेत. राजकारणाचे चौकटबध्द टप्पे सोडून या भागातील राजकारण गढूळ करण्याचे काम शिंदे पिता-पुत्र करत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकारण आता संपविण्याची वेळ आली आहे, अशी उव्दिग्न प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना गुरुवारी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीत नांदिवली पंचानंद भागात महायुतीचे कल्याण ग्रामीणमधील उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेनंतरच्या काही तासात मानपाडा पोलिसांनी आ. राजू पाटील यांचे कौटुंबिक नातेवाईक भाजपचे कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांना ठाणे जिल्ह्यातून तडीपार करत असल्याची नोटीस देऊन तातडीने तडीपार केले. या कारवाईमुळे भाजप, मनसेसह आगरी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा >>>आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त
कल्याण ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने राजेश मोरे यांना उमेदवारी देऊन राजू पाटील यांच्या समोर आव्हान उभे केले. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची परतफेड नाहीच, उलट आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केल्याने आ. पाटील संतप्त आहेत. शिंदेसेना-मनसेमधील हे व्दंद ग्रामीण भागात सुरू असतानाच आत राजू पाटील यांचे नातेवाईक माळी यांना तडीपार करण्यात आल्याने पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘संदीप माळी यांचे वडील हे आमचे मार्गदर्शक आहेत. संदीप यांच्या कुटुंबांशी आमचे घरगुती संबंध आहेत. पक्षीय संबंध बाजुला ठेऊन आम्ही नेहमीच एकत्र येत असतो. प्रचारानिमित्त आपण भोपर येथे गेलो होतो. त्यावेळी पक्षीय संबंध बाजुला ठेऊन भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांनी सर्वांसमक्ष आपला सत्कार केला. या गोष्टीचा राग मनात धरून झालेल्या इशाऱ्यानंतर संदीप माळी यांना रात्रीच मानपाडा पोलिसांनी बोलावून घेऊन रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली, असे आ. पाटील यांनी सांगितले.
राजकारण एका चौकटीत झाले पाहिजे. त्या चौकटी मोडून राजकारण गढूळ करण्याचे काम शिंदे पिता-पुत्र करत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकारण आता संपविण्याची वेळ आली आहे, असे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
‘ मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मनसेचे राजू पाटील हे माझे वैयक्तिक मित्र आणि नातेवाईक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचा धर्म म्हणून शिवसेना-भाजप व मनसेने एकत्रितपणे काम केले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या कामाचे फळ म्हणून मला पोलिसांकडून तडीपारची नोटीस देण्यात आली. आगरी समाजाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता सावध राहावे. महायुती धर्म पाळला म्हणून ही वेळ माझ्यावर आली. ती वेळ उद्या तुमच्यावर येऊ शकते,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे संदीप माळी यांनी दिली आहे.