बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक बंद करुन होम फलाटाला फलाट क्रमांक एक मध्ये रूपांतरित केले. मात्र यामुळे नव्या फलाटावर मोठी गर्दी होत असून त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. दररोज जेथे कोंडीसदृश्य स्थिती निर्माण होत असून त्याच्या चित्रफिती प्रसारित होत आहे. अशाच गर्दीची एक चित्रफित आपल्या फेसबुक खात्यावर टाकत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही कसली वाट पाहताय, असा प्रश्न विचारत पुन्हा परळ – एल्फिस्टन सारख्या एखाद्या घटनेनेच प्रशासनाला जाग येणार का असेही राजू पाटील यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसात विकासकामांच्या नावाखाली विविध निर्णय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांवर लादल्याचा आरोप होतो आहे. रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जुना फलाट क्रमांक एक बंद केला. त्याचवेळी होम फलाटाला फलाट क्रमांक एक मध्ये रूपांतरित केले. फलाट क्रमांक एकवर जाळी लावली आहे. त्यामुळे ज्या फलाटावरून मुंबईसाठी आणि मुंबई हून येणाऱ्या लोकल थांबत होत्या आणि प्रवासी दोन्ही बाजूने चढत उतरत होते, ते आता बंद झाले आहे. प्रवाशांना नव्याने पश्चिमेकडील फलाट क्रमांक एकवर चढावे आणि उतरावे लागते आहे.
सायंकाळी या फलाटावर उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. लोकलमधून उतरून फलाटावरून पादचारी पुलावर जाऊन स्थानकाबाहेर पडण्यासाठी मोठ्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. प्रवाशांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर असते की फलाटावर उभे असलेले प्रवासी लोकलमध्ये चढू शकत नाहीत. तसेच काही प्रवाशांना स्थानकाच्या मागच्या बाजूने पुढच्या बाजूला जायचे असल्यास तेही अशक्य होते आहे. प्रवाशांची गर्दीचे लोट पहायला मिळतात. या गर्दीत अनुचित प्रकार घडल्यास एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती होऊ शकते अशीही भीती व्यक्त होत आहे.
प्रवासी, रेल्वे संघटना, स्थानिक खासदार यांनीही रेल्वे प्रशासनाच्या या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ही जाळी कायमस्वरूपी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच रेल्वेच्या निर्णयावर आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. एक फेसबुक पोस्ट करत पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. राजू पाटील यांनी एक चित्रफित पोस्ट केली आहे. यात प्रवाशांची मोठी गर्दी दाटीवाटीने स्थानकाबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.
काय म्हणाले आहेत राजू पाटील पोस्ट मध्ये“हा चित्रफित दोन दिवसापूर्वीची आहे, परंतु आताही परिस्थिती अशीच आहे. तुम्ही कसली वाट पाहताय?मुंबई उपनगरची मुख्य वाहिनी म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. या रेल्वे प्रशासनाचे थोडे जरी नियोजन चुकले तर काय परिस्थिती ओढवू शकते त्याचं विदारक दृष्य परळ एल्फिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरीत संपूर्ण मुंबईने पाहिलं.
सध्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशीच अपघातजन्य परिस्थिती रोज पहायला मिळत आहे. प्रवाशांचा विचार न करता रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अचानक लावलेले फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्म उभारणीच्या कामात चुकलेले नियोजन धोक्याची घंटा ठरत आहेत. तरीही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय ? तुम्ही कसली वाट पाहताय ? पुन्हा परळ – एल्फिस्टन सारख्या एखाद्या घटनेनेच प्रशासनाला जाग येणार का ??” असे राजू पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.