ठाणे : रक्षाबंधन काहीच दिवसावर येऊन ठेपला असून शहरातील बाजारांमध्ये राख्यांचे विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. रक्षाबंधनास राजकीय रंग आल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेली राखी बाजारात दाखल झाली आहे. यांसह कुंदन आणि भावाकरिता ‘ब्रो’ असा शब्द लिहलेली राखी यंदा मुख्य आकर्षण ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाऊ-बहिणीचे नात्याची वीण जपणारा रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त राखी खरेदी करण्याकरिता ठाणे शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. यंदा शहरात विक्रेत्यांनी गुजरात, हैदराबाद, कर्नाटक अशा विविध ठिकाणांहून विक्रीसाठी राख्या आणल्या आहेत, तर काही विक्रेत्यांनी स्वत: तयार केलेल्या राख्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यंदा राख्यांमध्ये ३० हून अधिक विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. लहान मुलांसाठी विश्वचषक, कॅमेरा, मॅगी, बर्गर, स्कूटर, चंद्रयान, हत्ती अशा विविध गोष्टींच्या राख्या दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा >>>शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग- पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल

ठाण्यातील वामाक्षी राखी या दुकानांत १०० महिलांच्या मदतीने राखी तयार केली जाते. येथे एक रुपयांपासून राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहरातील असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या छायाचित्राची राखी येथे मोफत दिली जात आहे, असे विराग गांगर यांनी सांगितले.

राख्यांचे दर

कुंदन राखी – २५० रुपये

ब्रो नावाची राखी – १२५ रुपये

कार्टुन राखी – १० ते २०० रुपये

पर्यावरण पुरक राखी – १२० रुपये

गोंडा – १ ते १५ रुपये

सोन्याची राखी – ३००० ते ८००० रु.

चांदी राखी – ३०० रुपये

रेशीम राखी – २० ते ८० रुपये

फॅन्सी राखी – २०० रुपये.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan 2024 festival crowd to take raksha bandhan in markets of thane city amy