लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात ६२ हजार ५०० पुस्तकांचा वापर करून भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंदिरावर कलश ठेवण्याचा कार्यक्रम बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे १९ ते २८ जानेवारी या कालावधीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्ताने पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमात आयोजकांनी राम मंदिराची पुस्तकांची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यापासून पुस्तकांच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारणीला प्रारंभ करण्यात आला होता. ३० दिवसात ही प्रतिकृती पूर्ण करण्यात आली. ४० फूट लांब ८० फूट रूंदीची राम मंदिराची प्रतिकृती ५० फूट उंच आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पै फ्रेन्ड्स लायब्ररीच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती उभी राहिली आहे. कलादिग्दर्शक सिध्दार्थ बागवे यांनी ही कलाकृती उभारली आहे.

आणखी वाचा-ठाणे : ठेकेदाराने पालिका अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून पैसे काढले

दहा दिवस आदान प्रदान

सावळाराम महाराज क्रीडासंकुलात दहा दिवस चालणाऱ्या आदन प्रदान कार्यक्रमाचे उदघाटन १९ जानेवारी संध्याकाळी पाच वाजता शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, साहित्यिक भारत सासणे, कल्याण डोंबिवली पालिका समन्वयक रोहिणी लोकरे, निवृत्त शास्त्रज्ञ शरद काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. २० जानेवारी रोजी वित्त मंत्रालयातील सल्लागार परेश पाठक ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. २१ जानेवारी रोजी कविता आदान प्रदान हा कार्यक्रम डॉ. योगेश जोशी सकाळी ११ वाजता, संध्याकाळी सहा वाजता ‘वाचन संस्कृती कुठे गेली’ विषयावर चर्चासत्र, २२ जानेवारी रोजी ‘राम मंदिरच का,’ विषयावर डॉ. सच्चिदानंद शेवडे, डॉ. परिक्षित शेवडे यांच्याशी संवाद, २३ जानेवारी रोजी व्याख्यात्या धनश्री लेले यांचे ‘लोकभिराम श्रीराम” २४ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता लोककलाकार अशोक हांडे, निवेदिका दीपाली केळकर यांचा ‘मराठी बाण्याचे आनंदयात्री’ कार्यक्रम, २५ जानेवारीला निवृत्त कर्नल श्रीराम पेंढारकर यांचे ‘साद समरभूमीची’ व्याख्यान, २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता देशभक्तीपर गिते, संध्याकाळी सहा वाजता ‘यापुढचे जग कोणत्या उर्जेवर चालेल’ विषयावर डॉ. ब्रज शुक्ला यांचे व्याख्यान, २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता डॉ. योगेश जोशी यांचा पुस्तकावर बोलू काही, २७ जानेवारीला माधव जोशी यांची ‘टाटा एक विश्वास’ विषयावर मुलाखत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये घेतील. २८ रोजी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते आदान प्रदान सोहळ्याचा समारोप होणार आहे.