कोकण-ठाणे शिक्षक मतदारसंघाचे भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या यांच्या प्रचारार्थ आज ठाण्यात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी त्यांच्या विशेष भाषणशैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर तुफान फटकेबाजी केली.
हेही वाचा – कर्नाटकात जाऊन देवेंद्र फडणवीसांची थेट कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले…
काय म्हणाले रामदास आठवले?
“एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या तालमीत तयार झाले आहेत. त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला मान्यता दिली. मी उद्धव ठाकरेंना सांगत होतो की, महाविकास आघाडीबरोबर जाऊ नका. भाजपा आणि शिवसेनेने एकत्र राहावं ही जनतेची इच्छा आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी माझं ऐकलं नाही. त्यांनी जे नको तेच केलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नको ते करावं लागलं”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
“काही वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली. माझ्या समाजातल्या लोकांना मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गावर चालत आहेत. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली तर सामाजिक आणि आर्थीक न्याय आपल्या समाजाला मिळेल. वर्षानूवर्ष आपण एकमेकांचा द्वेष करून चालणार नाही. त्यानंतर २०१२च्या मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र आला आणि मुंबई महापालिकेत आपली सत्ता आली. खरं तर माझा पक्ष हा छोटा पक्ष आहे. मात्र, कोणाला निवडून आणायचं आणि कोणाचा सत्यानाश करायचा, याची जबाबदारी माझ्यावर आहे, असेही ते म्हणाले. यावरून त्यांनी कवितादेखील सादर केली. ”जरी माझा पक्ष असला छोटा तर निवडणुकीत आम्ही काढतो, विरोधकांचा काटा”, असे ते म्हणाले.
“यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकण-ठाणे शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. ते अत्यंत चांगले आणि देखणे उमेदावार आहेत. त्यामुळे त्यांनी भरगोस मतांनी निवडून द्यावे”, असा आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, यावेळी त्यांनी लोकसभा निवडणून लढवण्याचेही संकेत दिले. “आज मी राज्यसभेत आहे. माझी राज्यसभेची सदस्यता २०२६ पर्यंत आहे. त्यानंतर मी लोकसभेत येण्याचा प्रयत्न करणार आहे. आता एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे आता आम्हाला काळजी नाही”, असी प्रतिक्रिया त्यांनी दिली.