ठाणे : भिवंडीतील यंत्रमागांची धडधड, वडील यंत्रमाग कामगार अशा कठीण परिस्थितीत असूनही रमेश वसंत अडागळे हे पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाले. अत्यंत हालाकीची परिस्थिती असतानाही न्यायाधीश पदापर्यंतचा टप्पा गाठल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे, अभ्यास करताना ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राताची मोठी मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायीक सेवा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परिक्षेत महाराष्ट्रातून त्यांनी ४१ वा क्रमांक मिळविला आहे.

मूळचे बीड येथील असलेले रमेश अडागळे यांचे वडील ऊस तोड कामगार. १९९८ मध्ये त्यांचे वडील कुटुंबाला घेऊन रोजगारासाठी भिवंडी येथे आले. परंतु रमेश यांचे शिक्षण असल्याने ते आजी-आजोबांकडे बीड मध्येच वास्तव्यास होते. बीड येथील आरसडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण आसरादेवी येथे आणि अंबाजोगाई येथे यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

रमेश यांना शिक्षक बनायचे होते. २००९ मध्ये त्यांनी ‘डीएड’चे शिक्षण घेतले. २०१० मध्ये शिक्षक भरती निघाली. परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. एसआरटी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनीही रोजगारासाठी भिवंडी गाठली. ठाण्यातील एका कुकर बनविणाऱ्या कंपनीमध्ये पॅकींग तसेच इतर कामे केली. परंतु शिक्षण घेतले असल्याने आपले हे काम नाही असे सतत त्यांच्या मनात सतावत होते.

अखेर त्यांनी वकीली करण्याचा निर्णय घेतला. नारपोली येथील अण्णाभाऊ साठेनगरमधील झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी विधीचे शिक्षण घेतले. त्यासाठी ते ठाण्यातील टीएमसी विधी महाविद्यालायत शिकले. यंत्रमागामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांनी आणि गोदामांमध्ये टेम्पो चालविणाऱ्या त्यांच्या मोठ्या भावाने रमेश यांच्या शिक्षणासाठी प्रंचड मेहनत घेतली. २०१६ मध्ये विधी शिक्षण घेतल्यानंतर ते वकील म्हणून भिवंडीत काम करू लागले. परंतु आता न्यायाधीश बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी भिवंडीतील ॲड. संतोष शेजवळ यांच्या कार्यालयात प्रॅक्टीस करताना अभ्यास सुरु केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायीक सेवा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परिक्षेत महाराष्ट्रातून त्यांनी ४१ वा क्रमांक मिळविला आहे. आता ११ महिन्यांचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणार आहे. यंत्रमाग कर्मचाऱ्याच्या मुलाने इतका मोठा पल्ला गाठल्याने भिवंडीत सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

‘लोकसत्ता’ वृत्तपत्राची अभ्यासात मदत

तळागाळातील नागरिकांना न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी माझा प्रयत्न असेल. माझे वडील यंत्रमाग कामगार आहेत. कुटुंबियांच्या पाठींब्यामुळे हे शक्य झाले. माझ्या पूर्ण प्रवासात विधी विषयक अभ्यास करताना ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राची मोठी मदत झाली. त्यात येणारे संपादकीय, इतर सदरे, न्यायालयातील निर्णय-निवाडे याचे वाचन नेहमी करायचो असे रमेश अडागळे यांनी सांगितले.