ठाण्यात भाजप कार्यालयाचे उद्घाटन
तुम्ही आलात तर तुमच्यासोबत आणि नाही तर तुमच्याशिवाय निवडणुका लढवू, असे सांगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत शुक्रवारी ठाण्यातील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना दिले. तसेच ठाणे जिल्ह्य़ातील महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मित्रपक्षांसोबत युती करण्याचे किंवा स्वबळावर निवडणुका लढण्याचे असे सर्वस्वी अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथील खोपट परिसरात भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी ठाणे, मुंबई तसेच नाशिक महापालिकेच्या निवडणुकांमध्येही विजयाची परंपरा कायम राखली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली तरच पक्षाचा नक्कीच विजय होऊ शकेल. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेत्यांची साथ यांचा मेळ घातला तर विजयापर्यंत सहज पोहोचता येऊ शकेल, असेही दानवे यांनी सांगितले. या वेळी ठाणे जिल्हा विभागीय अध्यक्ष कपिल पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.
हक्काची जागा सोडू नका -सहस्रबुद्धे
रेल्वे प्रवासादरम्यान आपण आपल्या मित्राला बसण्यासाठी जागा देतो, पण प्रवास संपेपर्यंत तो मित्र आपल्याला पुन्हा ती जागा देण्याचे औदार्य दाखवत नाही, असा शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लागावत आपल्या हक्काची जागा कधीच सोडू नका, असा सल्ला भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी कार्यकर्त्यांना दिला. शहरातील नाक्यानाक्यांवर, वाडय़ा आणि वस्त्यांवर पक्षाचे अस्तित्व दाखवावे लागणार आहे. त्याचबरोबर पक्षाने ठरविलेला जाहीरनामा माझ्या वॉर्डाचा असेल अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण केली पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2016 रोजी प्रकाशित
स्वबळावर लढण्याचे दानवेंचे संकेत
ठाण्यात भाजप कार्यालयाचे उद्घाटन
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 30-04-2016 at 00:13 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve