वसई : हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांची नजाकत बघण्याचा अनुभव सर्वजण घेत असले तरी सध्या उन्हाळ्यात वसईत स्थानिक पक्षी बघण्याची तितकीच मजा पक्षीप्रेमींना अनुभवता येत आहे. यातच तांबट (कॉपर स्मिथ बारबेट) विविध रंगछटेचा पक्षी सध्या वसईत दिसत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने नुकत्याच एका घटनेत उष्माघातामुळे हा पक्षी जखमी अवस्थेत वसई पश्चिम परिसरात आढळून आला असला तरी झाडावर टुकटुक असा आवाज करणारा हा पक्षी सहजरीत्या दिसत नाही. परंतु पिंपळ, उंबर वड अशा झाडांवर फळांचे प्रमाण अधिक असल्याने हा पक्षी सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळी हमखास दिसून येत आहे.
उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमानाची तीव्रता ३८ अशांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने माणसासोबतच पक्षांना उष्म्याचा त्रास जाणवू लागला आहे. तापमानाचा पारा वाढल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन उडणारे पक्षी खाली कोसळून जखमी किंवा मृत झालेले दिसून येतात. नुकत्याच एका घटनेत वसई पश्चिम परिसरात भुईगाव समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उष्माघातामुळे तांबट पक्षी खाली कोसळून जखमी अवस्थेत पडला होता. मुंबई-वसई परिसरात हा पक्षी वर्षभर वावरत असतो, मात्र हा पक्षी सहसा कोणाला दिसत नाही. झाडावर टुकटुक असा आवाज काढत बसलेला चिमुकला पक्षी पानांच्या आड बसलेला असतो. निसर्गाने या पक्ष्याला हिरवा, लाल, काळा, पिवळा अशा विविध रंगांची उधळण केली आहे. या पक्ष्याला बघता क्षणी त्याच्या प्रेमात अनेकजण पडत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी दिली.
पक्ष्याची वैशिष्टय़े
* साधारण चिमणीच्या आकाराचा हा पक्षी १९ सेमी लांब असतो.
* तांब्याच्या हंडय़ावर हातोडय़ाच घाव घातल्यावर जसा आवाज येतो तशाच पद्धतीने हा ओरडतो. त्यामुळे स्थानिक भाषेत याला तांबट असे नाव पडले असावे, असे सांगण्यात येते.
* हा पक्षी शक्यतो वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवर राहणे पसंत करत असून फांदीवर चोचीने टोचून बीळ म्हणजेच घरटे तयार करतो.
* फेब्रुवारी ते एप्रिल हा या पक्ष्याच्या विणीचा हंगाम असतो.
* तांबट पक्ष्याला रसाळ फळे खायला भरपूर आवडत असून काहीवेळा छोटय़ा किटकावर ताव मारतो.
लहान मुलांना सध्या शालेय सुट्टय़ा लागल्या असून तांबट, कोकीळ यांसारख्या अनेक पक्ष्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे वसई किल्ला, गिरीज रोड, उमेळा रोड यांसारख्या वसईतील विविध ठिकाणी समुद्रकिनारी जाताना पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येईल.
-सचिन मेन, पक्षी अभ्यासक