लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : जांभळीनाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री या उत्सवासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. रश्मी ठाकरे यांना पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चैत्र नवरात्रौत्सवानिमित्ताने ठाकरे गटाच्या महिला आघाडीने रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा-मुख्यमंत्री शिंदेंच्या शहरात ४० टक्के भागात बत्तीगुल
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेवर ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री खासदार राजन विचारे यांनी रश्मी ठाकरे यांना देवीच्या आरतीसाठी आमंत्रित केले होते. रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. ठाकरे यांनी देवीची आरती केली. यापूर्वी टेंभीनाका येथेही नवरात्रौत्सामध्ये रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये ठिणगी उडाली होती. मंगळवारी चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे आल्याने ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा रंगली.