ठाणे – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी टेंभीनाका येथील देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. टेंभीनाका देवीचे दर्शन घेऊन त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळील देवीचे तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवीच्या दर्शनासाठी त्या गेल्या होत्या.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय माँ अंबे धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्रौत्सवाचे आयोजन सुरू केले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला. यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
हेही वाचा – डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येथील देवीचे दर्शन आणि महाआरती करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, उपनेत्या विशाखा राऊत, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, रोशनी शिंदे, सचिन चव्हाण यांच्यासह ठाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर, रश्मी ठाकरे ठाणे शहरातील ठाकरे गटाची चंदनवाडी भागातील मुख्य शाखेजवळील देवीचे दर्शन घेऊन रामचंद्र नगर येथील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवात त्यांनी भेटी दिली. तसेच शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरगुती देवीचे दर्शन घेतले. तर, राबोडी भागातील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्रौत्सवातही त्या सहभागी झाल्या होत्या.