कल्याण: दुर्बल घटकातील लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या दिवाळी सणापूर्वीच्या वस्तू पुरवठादारांकडून विविध भागातून येऊन त्या वस्तुंच्या स्वतंत्र पुडक्या बांधून त्या एका पोतडीत टाकून मग लाभार्थींना देण्यात येणार आहेत. राज्यात प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग आणि अल्पवधीत हा निर्णय घेण्यात आल्याने थोडा विलंब झाला. पण, येत्या चार दिवसात दुर्बल घटकातील राज्यातील सर्व लाभार्थींना शिंदे-फडणवीस सरकारच्या दिवाळी भेटीचे कीट हातात पडेल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुर्बल घटकातील नागरिकांची दिवाळी गोड, आनंदात साजरी झाली पाहिजे म्हणून १५ दिवसापूर्वी राज्यातील दुर्बल घटकातील पिवळी शिधापत्रिका असलेल्या एक कोटी ८० लाख नागरिकांना १०० रुपयांमध्ये रवा, मैदा, चणाडाळ आणि तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार भावात या वस्तू दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत जातात.
दिवाळी सणापूर्वी या वस्तू लाभार्थींना मिळाल्या पाहिजेत म्हणून आपण नियमित अन्न पुरवठा विभागाच्या सचिव, नियंत्रकांच्या संपर्कात आहोत. अल्पावधीत आणि प्रथमच अशाप्रकारचे निर्णय घेणारे शिंदे-फडणवीस सरकार आहे. यापूर्वीच्या सरकारने दुर्बल घटकांना कधी साखर तर कधी रवा देण्याचे प्रयत्न केला. चार वस्तू एकावेळी देण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. या कामाचा तसा अनुभव पुरवठादार किंवा शासकीय यंत्रणांना नसल्याने दिवाळी भेट पोहचविण्यास थोडा विलंब झाला. दिवाळी भेटीतील चारही घाऊक वस्तू चार वेगळ्या ठिकाणाहून पुरवठादार पुरवठा करत आहेत. या वस्तू मुंबईत एकत्र ठेवण्यासाठी गोदाम नाहीत. त्या साठ्याची सोय आयत्यावेळी करावी लागली. या चारही वस्तू घाऊक स्वरुपात एकत्र ठेवल्या नंतर तेथे त्या लहान पिशव्यांमध्ये भरण्यात येतील. त्या चारही वस्तू एका पिशवीत भरुन मग शिधावाटप दुकानांना पोहच केल्या जाणार आहेत, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.
या वस्तू एकत्रित ठेवताना त्या फाटणार नाहीत. त्यांची भेसळ होणार नाही. तेल या पिशवीत सुरक्षित राहिल याची काळजी घेऊन या पिशव्या एकत्रित भरल्या जाणार आहेत. दिवाळी भेटच्या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छब्या आणि दिवाळी शुभेच्छा संदेश असणार आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. दिवाळी भेटचा ५० टक्क्याहून अधिक साठा गुरुवारपर्यंत जिल्ह्याच्या प्रत्येक शिधासाठा गोदाम केंद्रांवर पोहच होईल. तेथून त्या अंतर्गत वाहतुकीने गाव, शहरी, पाड्यांपर्यंत पोहचविण्यात येतील. शिधावाटप दुकानदारांनी अतिशय शिस्तबध्द पध्दतीने या वस्तुंचे वाटप करावे. एकही लाभार्थी दिवाळी भेट पासून वंचित राहात कामा नये, असे आदेश जिल्हा नियंत्रकांना देण्यात आले आहेत.
” चार वस्तुंचे पुरवठादार वेगळे आणि चार वस्तू विविध ठिकाणाहून गोदामात एकत्र आणायच्या आहेत. या चारही वस्तु स्वतंत्र बांधून त्या नंतर एका पिशवीत टाकून लाभार्थींना वाटप करायच्या आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आणि अनुभव आहे. ६० टक्क्यांहून अधिकचा दिवाळी भेटीचा साठा दोन दिवसात जिल्हा पुरवठा केंद्रांना होईल. शनिवारपर्यंत सर्वच लाभार्थींच्या हातात दिवाळी भेट असेल.”
– रवींद्र चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य.