‘वंचितांचा रंगमंच’ चळवळीचा उद्देश सफल झाल्याची रत्नाकर मतकरी यांची भावना
दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वंचितांचा रंगमंच उपक्रमात सक्रिय सहभाग घेणाऱ्या युवकांच्या वैचारिक आणि नाटय़ प्रतिभेचा विकास होत आहे. सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून त्यांची यशस्वी मांडणी रंगमंचावर करणाऱ्या युवक त्यातून आनंदही मिळवत आहेत. वंचितांचा रंगमंच ही चळवळ सुरू करण्यामागाचा हा मुख्य उद्देश आता सफल होताना दिसत आहे, अशी कबुली ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ठाण्यात दिली. रत्नाकर मतकरी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आणि ‘बालनाटय़’ व ‘समता विचार प्रसारक संस्था’ यांनी आयोजित केलेल्या वंचितांचा रंगमंचच्या ‘नाटय़ जल्लोष २०१६’ या उपक्रमाच्या निमित्ताने मतकरी बोलत होते.
ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या या युवा नाटय़ जल्लोषमध्ये मानपाडा-ढोकाळी, किसननगर, लोकमान्यनगर या वस्तीतील मुलांनी आपल्या नाटिका सादर केल्या. साने गुरुजी स्मृती दिनाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून यंदा ‘युवा नाटय़जल्लोष’मध्ये ‘भारताचे संविधान आणि सद्य:स्थिती’ या विषयावर नाटिका सादर करण्यात आल्या. मानपाडा-ढोकाळी विभागातील मुलांनी ‘लोकशाहीचा हक्क’, किसाननगर विभागाने बालमजूर समस्या प्रभावीपणे दाखवून शिक्षणाचा अधिकार या विषयावर नाटिका सादर केली. तर लोकमान्यनगर विभागातील मुलांनी धर्म निरपेक्षता हा मुद्दा उलगडला. सावरकरनगर येथील गृहिणींनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा नाटकातून दाखवला. वैषणी साळवी हिने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकपात्रीतून उपस्थित केला. दुर्गा माळी हिने शिक्षणाचा अधिकार या विषयावर स्वगत सादर केले. या सर्व नाटिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिग्दर्शक विजू माने, सुप्रसिद्ध कलाकार उदय सबनीस आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदय सबनीस यांनी मुलांच्या अभिनयाचे कौतुक केले. या उपक्रमाचा सुरुवातीपासून साक्षीदार असून मुलांच्या अभिनय कौशल्य आणि सादरीकरणामध्ये झालेल्या सुधारणेचे त्यांनी विशेष कौतुक केले. समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे अध्यक्ष जगदीश खैरालिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा