Ravindra Chavan criticism of Ramdas Kadam : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रविवारी ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केले. यावरून संतप्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी नेते कदम यांना प्रत्युत्तर देताना, गेल्या ४० वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार, मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे, असे आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री चव्हाण यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम डोंबिवलीतील सावरकर उद्यानातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना लक्ष्य केले. मुंबई-गोवा महामार्ग हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील विषय आहे. कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यात लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण स्वत:, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला. याबद्दल कदम पिता-पुत्रांनी आपले कौतुक करायला हवे. ते राहिले बाजूला, उलट मलाच लक्ष्य करण्याचा रामदास कदम यांचा प्रयत्न असेल तर जशास तसे उत्तर देण्यास रवींद्र चव्हाण समर्थ आहे. त्यासाठी कदम यांनी ठिकाण सांगावे, असा इशारा मंत्री चव्हाण यांनी दिला.

हेही वाचा – रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका

युती धर्म पाळण्याचा फक्त रवींद्र चव्हाण यांनी ठेका घेतलेला नाही. ती युतीमधील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असे मंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सूचित केले. भाजप म्हणून आपण अतिशय संयम, सौजन्याची भूमिका घेऊन विकास कामे, लोकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. रामदास कदम आपणास विकास कामांच्या विषयावरून लक्ष्य करत असतील तर सौजन्याचा मार्ग बाजूला ठेऊन आपण जशास तसे उत्तर देण्यास आणि प्रसंगी वाईट वागण्यासही तयार आहोत, असा खरमरीत इशारा मंत्री चव्हाण यांनी कदम यांना दिला.

हेही वाचा – Ramdas Kadam : भाजपकडून योगेश कदमांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, रामदास कदम यांची भाजपवर टीका

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात रामदास कदम मंत्री होते. अनेक वर्षे ते कोकणाचे नेतृत्व विधीमंडळात करतात. या ४० वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोकणासाठी काय आणि कोणती कामे केली. विकास कामे सोडाच पण कोणते दिवे लावले, असा प्रश्न मंत्री चव्हाण यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना अनावश्यक महत्व दिल्याने ते मोठे झाले, असे मंत्री चव्हाण म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मंत्री रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेकडून समाज माध्यमांतून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या मागचा बोलविता धनी कोण, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra chavan criticism of ramdas kadam he asked what ramdas kadam did for konkan ssb