डोंबिवली – डोंबिवलीत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असला. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून एका व्यासपीठावर येणार असले की, त्या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर शिंदे यांनी नेहमीच दांडी मारण्याचे धोरण ठेवले आहे. या राजकीय धुसफुसीची नेहमीच डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात चर्चा असते.
सोमवारी डोंबिवलीत आपल्या मतदारसंघात अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण असुनही कार्याध्यक्ष चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेश बैठकीचे कारण देत पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे पत्र आयोजक कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांना दिले आहे. या अनुपस्थितीमधून चव्हाण यांनी ‘कलटी’ मारून खासदार शिंदे यांच्या ‘दांडी’मार सूत्राला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
डोंबिवलीत ज्या ज्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक संस्था यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, स्थानिक भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना निमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाच्यावेळी खासदार शिंदे यांनी वेळोवेळी चव्हाण यांच्या सोबत व्यासपीठावर येणे टाळले.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरण कार्यक्रमाला खासदार शिंदे यांना आमंत्रण असुनही त्यांंनी देवदर्शनाचे कारण सांगून कार्यक्रमस्थळी येणे टाळले होते. दोन महिन्यापूर्वी डोंबिवलीत पै फ्रेन्डस लायब्ररीतर्फे पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमात खासदार शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. खासदार शिंदे आपल्या समर्थकाच्या नव्याकोऱ्या बुलेटवरून आदान प्रदान कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी येऊन हजेरी लावून नंतर निघून जाणे पसंत केले होते. उद्योग मंत्री उदय सामंत, कार्याध्यक्ष चव्हाण या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते.
खासदार शिंदे, आमदार चव्हाण यांचे कितीही सख्य असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्यामधील अंतर्गत कुरबुरी कायम आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी डोंबिवलीत भाजपने काम केला नसल्याचा शिवसेनेचा आक्षेप आहे. घटलेले मताधिक्य खासदारांच्या वर्मी लागल्याने ते तो राग चव्हाण यांच्या सोबत व्यासपीठावर जाण्यास टाळून व्यक्त करत असल्याची चर्चा आहे.
चव्हाण यांचीही मागणी
घारडा सर्कल येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. दरम्यान, पुतळे उभारणीसंदर्भातची शासनाची कठोर नियमावली आली. त्यांनी याविषयी शांत राहणे पसंत केले होते. डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून अश्वारूढ पुतळ्याची उभारणी होत आहे याचा आपणास आनंद आहे. या परिसराची ओळख यापुढे घारडा चौक नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी व्हावी, अशी मागणी चव्हाण यांनी आयुक्त जाखड यांच्याकडे केली आहे.
भाजपची वरिष्ठ स्तरावर एक बैठक आहे. केंद्रीय नेतृत्व त्यात मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला येणार नाहीत. यात रुसव्याफुगव्याचा विषय नाही. शशिकांत कांबळे, प्रदेश नेते, भाजप.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कार्याध्यक्ष चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी पालिकेला कळविले आहे. राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.