लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली – येथील खंबाळपाडा भागातील केडीएमटी बस आगारा जवळील सात माळ्याची गेल्या वीस दिवसापूर्वी पालिकेच्या फ प्रभाग अधिकाऱ्यांनी तोडलेली इमारत विकासकांनी पुन्हा हिरव्या जाळ्या लावून जोडण्याचे काम सुरू केले आहे. इमारत तोडताना खांब तोडले जात नसल्याने त्याचा गैरफायदा विकासक घेत असल्याच्या तक्रारी तक्रारदारांनी केल्या आहेत.
खंबाळपाडा येथे डोंबिवली – कल्याण रस्त्यावर केडीएमटी बस आगार जवळ एस. एस. स्टील मार्ट शेजारी जमीन मालक धनंजय शेलार, विकासक अश्विनी ब्रिजराज पांडे, संदीप मोहन डोके, महेश मधुकर लहाने यांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली. सुरूवातीला या इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेचे नगररचना विभागाचे तत्कालीन साहाय्यक संचालक सुनील जोशी यांनी तीन माळ्याची इमारत उभारणीला परवानगी दिली होती. परंतु, भूमाफियांनी पालिकेला अंधारात ठेऊन या इमारतीवर वाढीव चार मजले बांधले.
आणखी वाचा-डोंबिवलीत आयरे येथील बेकायदा इमारत जमीनदोस्त
वर्दळीच्या रस्त्यावरील ही इमारत बेकायदा असल्याने त्यावर कारवाई करावी म्हणून तक्रारदार राजेंद्र नांदोस्कर यांनी १२ वर्षापासून या इमारतीवर कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. परंतु,एका वाद्ग्रस्त पालिका अधिकारी या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्नशील होता. हा अधिकारी दोन वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतर या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून नांदोसकर यांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या.
फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्तांनी या बेकायदा इमारतीची माहिती नगररचना विभागाकडून मागवून भूमाफियांना नोटिसा बजावल्या होत्या. या इमारत बांधकामाची सर्व कागदपत्रे दाखल करण्याची मागणी केली होती. त्याला माफियांनी प्रतिसाद दिला नाही. साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी ही इमारत अनधिकृत घोषित करून त्यावर १५ दिवसापूर्वी कारवाई केली होती.
या इमारतीचे फ प्रभाग अधिकाऱ्यांनी फक्त सज्जे, भिंती तोडल्या. त्यामुळे कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी माफियांनी या इमारतीला तोडलेल्या भागात हिरवी जाळी लावून तोडलेला भाग पुन्हा जोडण्यास सुरूवात केली आहे. या इमारती मधील सदनिका घर खरेदीदारांना विकण्याच्या हालाचाली माफियांनी सुरू केल्याचे समजते.
आणखी वाचा-कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा
ग्राहकांची घर खरेदीत फसवणूक होण्यापूर्वीच फ प्रभाग अधिकाऱ्यांनी ही बेकायदा इमारती भुईसपाट करण्याचे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी देण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
खंबाळपाडा येथील तोडलेली इमारत पुन्हा जोडण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासंदर्भात पाहणी करून पोलीस बंदोबस्त मिळाली की ती इमारत आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाईल. -चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.