राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतल्याने उल्हासनगर महापालिकेच्या ओबीसी आरक्षण प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्वसाधारण महिलांसाठीची आरक्षण सोडत नव्याने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी उल्हासनगर महापालिकेच्या शहीद अरुण कुमार वैद्य सभागृहात ४९ सर्वसाधारण जागांसाठीची आरक्षण सोडत पूर्ण झाली. यात २४ जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. तर उर्वरित जागा सर्वसाधारण झाल्या आहेत.
उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठीची सोडत प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र या प्रक्रियेत काही तांत्रिक चुका राहिल्याचा अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाने उल्हासनगर महापालिकेच्या सोडत अहवालावर दिला होता. तसेच ही प्रक्रिया पुन्हा नव्याने करण्याचे आदेश उल्हासनगर महापालिकाला दिले होते. त्यानुसार बुधवार, ३ ऑगस्ट रोजी उल्हासनगर महापालिकेने एकूण ८९ जागांपैकी ४९ जागांसाठीची सोडत प्रक्रिया पूर्ण केली. यात सर्वसाधारण गटातील महिलांच्या २४ जागा निश्चित करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार २० जागांवर सर्वसाधारण महिलांचे थेट आरक्षण निश्चित करण्यात आले. तर उर्वरित चार प्रभागांमध्ये आरक्षण सोडतीद्वारे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ४९ पैकी २४ जागा महिलांसाठी निश्चित झाल्या. तर उरलेल्या २५ जागा सर्वसाधारण राहिल्या आहेत. या प्रक्रियेत जवळपास १२ प्रभागांमध्ये आरक्षणात फेरबदल झाला आहे. प्रभाग क्रमांक ४ ब, ५ ब, ६ क, ७ ब, ८ क, १० क, १४ क, १५ क, २० क, २२ ब, २४ आणि २८ क या जागांवरचे आरक्षण बदलले आहे.
यापैकी सहा ठिकाणी महिला आरक्षणावरून सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले आहे. या आरक्षण बदलामुळे उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.