डोंबिवली – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात माझे तिन्ही सख्खे चुलत भाऊ, एकाच परिवारातील सदस्य एकाचवेळी गेले. अतिशय चीड आणणारी घटना आहे. चिडचिड, त्रागा, संताप याशिवाय आपण काही करू शकत नाही. आता फक्त एकच दिसते, आपण भारताला अमेरिकेसारखो बनवायला निघालोय, ते करायचे तेव्हा करा, पहिले देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. त्यांच्या जीवनात सुखकर जीवन आणि सुरक्षिततेचे अच्छे दिन आणा. कष्ट, मेहनत, घाम गाळून जगणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, सुखाने जगता येईल याची पहिले काळजी घ्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पर्यटन हल्ल्यातील मृत संजय लेले यांचे नातेवाईक कौस्तुभ लेले यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

भारत कसा विकासाच्या दमदाट वाटेवर आहे. या दमदार वाटेवरून आपण कसे भारताची अमेरिका बनवायला निघालो आहे अशा बाता दररोज ठोकुन मारल्या जात आहेत. ट्रिलियन अर्थव्यवस्थेची स्वप्ने नागरिकांना दाखवली जात आहेत. हे जरूर दाखवा. पण पहलगाम येथे निष्पाप पर्यटक नागरिकांचे दहशतवाद्यांनी बळी घेतले. त्यामुळे देशातील सामान्य नागरिकांचे जीव कागदाचा कपटा आणि कवडी मोलाचे आहेत हेच दिसून आल आहे.

मोठमोठ्या बाता करताना देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत. त्यांची किती कोणाला काळजी आहे. हे या हल्ल्याने स्पष्ट झाल्याने आता भपकेबाजपणा, ब्रॅन्डिंग करणे सोडा. आणि भारतीय नागरिकांच्या आयुष्यात सुखकर, सुरक्षित जीवनाचे अच्छे दिन येतील याची पहिले काळजी घ्या, अशी सूचना कौस्तुभ लेले यांनी सरकारला केली.

देशाच्या विविध भागातील सैनिक नियमित दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होतात. माणुस गेल्यानंतर त्या कुटुंबाचा मोठा आधार जातो. अनेक वर्षाच्या अघोषित युध्दात हजारोनी सैनिक शहीद झाले. घरातील कर्ता गेला की ती तूट कधीच भरून येत नाही. तेच लेले, जोशी आणि मोने मावस भावांच्या एकत्रित जाण्याने झाले आहे. या तिन्ही कुटुंबातील कर्तेधर्ते पुरूष अचानक गेले आहेत. दहशतवादी हल्ल्यांचा हा सिलसिल अनेक वर्षापासून सुरूच आहे. नागरिक ते थांबण्याची प्रतिक्षा करत आहेत. यासाठी भारताने आता ठोस कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे लेले यांनी सांगितले.

ट्रिलियन अर्थव्यवस्था, बुलेट ट्रेन, भपकेबाजपणाचे नागरिकांना अजिबात कौतुक नाही. या गोष्टी नसताना तो त्याचे कष्ट, मेहनत करून, शेतकरी राहुन सुखाने राहू शकतो. यासाठी त्याला दर्जेदार सुखकर, सुरक्षित, आरोग्यमय, गुन्हेगारी मुक्त जीवनाची गरज आहे. छानछोकी पणाला देशातील नागरिक अजिबात भुलणारा नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या गरजा ओळखुन सरकारने पावले टाकावीत, अघोषित युध्दाने जाणारे प्राण वाचवावेत, आवाहन लेले यांनी केले.

अमेरिका बनण्याच्या नादात आपण भारतीय नागरिकांची सुरक्षितता, सुखी जीवन विसरत चाललो आहेत. अमेरिका बनणे आपल्याकडून अति होत चालले आहे. बर, अमेरिकेपासून काय घेणार तर, तेथे तरुण पीढी नशेच्या विळख्यात, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, दिवसाढवळ्या गोळीबार, मनस्वास्थ बिघाडलेली माणसे, संस्कारांचा अभाव. अशा अमेरिकेपासून आपण भारत बनविणार, घडविणार का, असा प्रश्न करून भारतामधील नागरिकांना फक्त सुखकर जीवन आणि सुरक्षिततेची हमी द्या, असे आवाहन लेले यांनी सरकारला केले आहे.

मित्र परिवार प्रतिक्रिया

हेमंत जोशी हे शांत, मनमिळाऊ स्वभावाचे होते. मागील पाच वर्ष ते आमच्या भागशाळा मैदानजवळील सावित्री सोसायटीचे सचिव होते. ते सर्वांशी सलोख्याने राहायचे. सोसायटीत कधी काही वाद तंटा होणार नाही याची काळजी घ्यायचे. झाले तरी ते पुढाकार घेऊन विषय संपुन टाकायचे. त्यांच्या जाण्याने एक चांगला शेजारी आणि मित्र गमावला आहे. पृथ्वीराज जोंधळे, व्यावसायिक.

आपण ज्येष्ठ नागरिक असलो तरी हेमंत जोशी आपल्याशी मित्रासारखे वागायचे. सोसायटीतील वातावरण गुण्यागोविंदाचे असेल याची काळजी घ्यायचे. काश्मीरला जाताना त्यांनी आपल्या बंद घरावर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. त्यांच्या मृत्युची बातमी समजताच आमच्या सोसायटीतील प्रत्येक सदस्य हादरला. डाॅ. जी. एन. पाचपांडे– रहिवासी, सावित्री सोसायटी.

संजय लेले आणि मी १९८४ पासून मित्र होतो. स. वा. जोशी शाळेत एकत्रितपणे पायी जात होतो. सुभाषचंद्र बोस रस्त्यावर लेले वाडा होता. तेथे एकत्र कुटुंब पध्दतीने लेले कुटुंब राहत होते. संजय शालेय जीवनापासून हुशार, मनमिळाऊ स्वभावाचा होता. शाळेनंतर एकत्रितपणाचा प्रवास संपला तरी कधी तरी रस्त्याला संजय भेटला की आवर्जून विचारपूस करत होता. त्याच्या अचानक जाण्याने धक्का बसला. लक्ष्मीकांत भोईर- पोलीस पाटील, देवीचापाडा, डोंबिवली.

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याचा बदला घेण्याची गरज आहे. तीच मृतात्म्यांना आदरांजली ठरेल. ॲड. नवीन सिंग प्रदेश अध्यक्ष, नागरी विकास सेल, काँग्रेस समिती.