ठाणे : केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पुत्र व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर आता खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना – भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना – भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल, त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असेही त्यांनी म्हटले आहे.