ग्रंथालय केवळ स्थापन करून चालत नाही, तर निगुतीने त्याची जोपासना करावी लागते. त्यामुळेच ते वाढते. वाचकांची वाचनाची भूक भागवण्यासाठी ग्रंथसेवकाला कायम तत्पर राहावे लागते. ते सोपे काम नसते. एकटय़ा व्यक्तीने ग्रंथालयाचा कारभार पाहायचा ही तर निव्वळ अशक्य गोष्ट आहे. कल्याणमधील कल्याण मराठी ग्रंथालयाचे ६८ वर्षीय भिला गवळे मात्र वाचनसंस्कृती आणि ग्रंथांवरील प्रेमापोटी एकटय़ाने हा पसारा सांभाळत आहेत. एअर इंडियातून निवृत्त झाल्यावर २००६ मध्ये भिला गवळे यांनी टिळक चौकात ज्ञानदान या नावाने ग्रंथालय स्थापन केले. कालांतराने हे ग्रंथालय आणि सध्या असलेले कल्याण मराठी ग्रंथालय एकत्र करून रामदासवाडी येथे कल्याण मराठी ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. सध्या या ग्रंथालयात एकूण पाच हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. निवृत्तीनंतर काही तरी विरंगुळा असावा आणि लोकांना चांगली पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, हा ग्रंथालय स्थापन करण्यामागचा त्यांचा हेतू होता. या व्यवसायातून नफा कमवण्याचा त्यांचा अजिबात उद्देश नव्हता. मात्र अतिशय मेहनतीने उभारलेल्या या ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी फारसे वाचकच येत नाहीत. त्यामुळे हा सर्व खटाटोप कशासाठी, असा प्रश्न त्यांना आता पडला आहे.
कल्याणमधील रामदासवाडी परिसरात लहानशा जागेत असणारे हे कल्याण मराठी ग्रंथालय. ग्रंथालयात प्रवेश केल्यावर चारही बाजूला पुस्तकांनी भरलेली कपाटे, दारापाशीच असणारी विविध प्रकारची मासिके, दिवाळी अंक यामुळे जुन्या, नव्या पुस्तकांचा दरवळ अनुभवायास मिळतो. भिला गवळे दररोज स्वत: ग्रंथालयात उपस्थित असतात. कथा, कादंबऱ्या, चरित्रे, आरोग्य यांसारख्या विषयांच्या पुस्तकांची मांडणी विभागानुसार करण्यात आली आहे. नवीन आलेल्या पुस्तकांना गवळे स्वत: कव्हर घालतात. पुस्तके स्वत: शिवतात. एअर इंडियामध्ये कार्यरत असताना महाराष्ट्र मित्र मंडळाचे सदस्य असल्याने ग्रंथालय स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. खूप उत्साहाने दहा वर्षांपूर्वी स्थापन केलेले हे ग्रंथालय आता मात्र वाचकांच्या प्रतीक्षेत आहे. सध्या ग्रंथालयात हजारो दर्जेदार पुस्तके असूनही सभासद अवघे ३० आहेत. सुरुवातीला ग्रंथालयाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र तो उत्साह पुढे टिकला नाही. त्यामुळे हे ग्रंथालय बंद करण्याच्या मन:स्थितीत गवळे आहेत. ग्रंथालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० रुपये आणि इतर सभासदांसाठी ७० रुपये अशी माफक मासिक वर्गणी आकारण्यात येते.
ग्रंथालय हे वाचकांनी चालवावे
पूर्वी वाचकांची संख्या वाढावी यासाठी दिवाळी अंकासोबत मोफत कालनिर्णय अशी योजना अमलात आणली होती. मात्र कालांतराने त्या योजनेलाही प्रतिसाद कमी झाल्यावर योजना बंद करण्यात आली. दर सहा महिन्यांनी शक्य होईल, त्यानुसार पुस्तकांची खरेदी गवळे स्वत: उत्साहाने करतात. मात्र वाचकांची जेव्हा पुस्तकांसाठी मागणी नसते, तेव्हा उत्साह संपतो, असे भिला गवळे तळमळीने सांगतात. सध्या ग्रंथालय ज्या जागेत आहे, तिथून शहाड परिसरापर्यंत जवळपास कोणतेही ग्रंथालय नाही. परिसरातील नागरिकांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, यासाठी ग्रंथालयातर्फे आवाहनही करण्यात आले. मात्र या आवाहनालाही नागरिकांचा प्रतिसाद लाभला नाही.
अन्यथा ग्रंथालयाला प्रतीक्षा पालनकर्त्यांची
सध्या भिला गवळे ६८ वर्षांचे असून या वयातही ग्रंथालयाचा कारभार पाहत आहेत. मात्र आपल्या पश्चात ग्रंथालयातील हे साहित्य रद्दीत न जाता सुजाण नागरिक घडण्यासाठी या ग्रंथालयातील पुस्तके कायम कुणाच्या संग्रही राहावीत अशी भिला गवळे यांची इच्छा आहे. सुजाण नागरिकांनी ग्रंथालयातील पुस्तकांना आपलेसे करून ग्रंथालयाला जीवदान द्यावे असे आवाहन भिला गवळे यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा