भुयारी मार्गाचे काम अडकल्याने नागरिकांचा जीव धोक्यात..

अ‍ॅड. संध्या वायंगणकर, ठाणे
घोडबंदर रोड येथील लौकीम कंपनीसमोर असलेल्या आर मॉलला हल्ली खूप गर्दी वाढतच आहे. द्रुतगती मार्गामुळे सर्व वाहने वेगाने धावत असतात. मॉलला येणारे लोक व आजुबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना सतत या रस्त्याचा वापर करावा लागतो व रस्ता खूप रुंद असल्यामुळे तो ओलांडताना खूप वेळ ताटकळत उभे रहावे लागते. आतापर्यंत या ठिकाणी हा रस्ता ओलांडताना कित्येक लोक मरण पावले आहेत. आर मॉल शेजारीच्या सोसायटीमधीलच तीन जण रस्ता ओलांडताना मरण पावले असून, दोन जण जखमी होऊन औषधोपचार घेत आहेत. पालिका प्रशानाकडे वारंवार तक्रारी करूनही काही उपयोग झालेला नाही. भुयारी मार्गाच्या कामाच्या ठिकाणी केवळ ठाणे महानगरपालिकेने फक्त पत्रे बांधून ठेवले आहेत. दहा दिवसांपूर्वी खड्डा खणण्याचे काम सुरू होते. आता तेही काम पुन्हा बंद पडले आहे. केवळ आश्वासने देत कामे अर्धवटच ठेवण्यात आली.

राज्यराणीचा ठाणे थांबा पूर्ववत ठेवावा
सचिन मिसाळ, ठाणे
ठाणे ते बोरीबंदर स्थानकादरम्यान धावणारी पहिली रेल्वे ही ठाण्याची ओळख. त्यामुळे या आधी सर्वच लांब पल्याच्या गाडय़ा ठाणे स्टेशन घेतल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नव्हत्या. पण नंतर नवीन लोकल मार्ग होत गेले आणि कालांतराने ठाणेकरांना याची झळ प्रकर्षांने जाणवायला लागली ती आजतागायत. फलाट कमी पडतात, या नावाखाली किती तरी लांब पल्ल्याच्या गाडय़ा या ठाण्याला न थांबेनाशा झाल्या. ठाणे-पनवेल लोकल मार्गाची त्यात भर पडलीच. पण त्यात गैरसोय म्हणून एकेक गाडय़ा न थांबवण्याचा सपाटाच जणू रेल्वे प्रशासनाने लावलाय असे दिसते. नुकत्याच ऐकीवात आलेल्या बातमीनुसार राज्यराणीचा ठाणे थांबाही काढण्यात आला. ंथोडक्यात त्यांच्या सहनशिलतेचा प्रशासन अंत पाहात आहे. लढा देणाऱ्या जागरूक संघटनांचा आवाजही आता कुठे दिसत नाही. त्यामुळे राज्यराणीचा ठाणे थांबा हा पूर्ववत ठेवावा ही अपेक्षा.

Story img Loader