सार्वजनिक वाचनालय म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले ग्रंथालय. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात झपाटय़ाने शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. त्यामुळे निर्माण झालेली वाचनाची, ज्ञान मिळविण्याची तृष्णा शमविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये स्थापन होऊ लागली. त्यातूनच ऐतिहासिक कल्याण शहरात ३ फेब्रुवारी १८६४ रोजी कल्याण सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. त्या वेळचे कल्याण नगरीतील एक प्रतिष्ठित रावबहादूर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी आपल्या साहित्याच्या आवडीतून स्वत:च्या जागेत ‘नेटिव्ह वाचनालय’ या नावाने या वाचनालयाची स्थापना केली. दीर्घकाळापासून कल्याणकरांना साहित्य सेवा पुरवणाऱ्या या ग्रंथालयात सध्या ६५ हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह असून तीन हजारांहून अधिक सभासद आहेत. ग्रंथालयात प्रवेश केल्यावर कादंबरी, लघुकथा, चरित्र, ऐतिहासिक, नाटक, धार्मिक असे पुस्तकांचे अनेक विभाग आपल्या दृष्टीस पडतात. नवीन आलेल्या पुस्तकांसाठी स्वतंत्र विभाग असून नवीन पुस्तके वाचकांसाठी तातडीने उपलब्ध करून दिली जातात.
कादंबरी विभाग
चिंतामणी जोशी यांची ‘संस्कृतशारंगधर वैद्य ग्रंथ’, ‘महाभारत ३ पर्व’ ही मोरोपंतांची कादंबरी, ‘गद्य रत्नावली’ ही विद्या मानेकर यांची कादंबरी अतिशय दुर्मीळ आहे. बालाजी प्रभाकर मोडक यांची ‘निजामशाही घराण्याचा इतिहास’ ही संग्रहातील सर्वात जुनी कादंबरी आहे.
ललित/कवितासंग्रह
रंगनाथ सखाराम लाळे यांचे ‘वैद्य कलानिधी’ हे ललित विभागातील पुस्तक, तर कवितासंग्रहात वामन दाजी ओक यांचा ‘पद्यसंग्रह- भाग दुसरा’, ‘लघुकाव्यमाला- भाग दुसरा’ हे कवितासंग्रह या विभागातील दुर्मीळ ठेवा आहे.
धार्मिक/राजकीय विभाग
धार्मिक विभागात ‘महाभारत- ४ विराट पर्व’, ‘महाभारत- ५ उद्योगपर्व, ‘मंत्र भागवत प्रथममाला’ हे धार्मिक ग्रंथ आजही संग्रहात वाचनासाठी उपलब्ध आहेत. राजकीय विभागातील ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ‘पंजाब प्रकरण’ ही सुजाता जोग यांची पुस्तके, ‘सामाजिक वाद’ हे विनायक सरवदे यांचे राजकीयविषयक पुस्तक या विभागात उपलब्ध आहे.
वाचकांच्या सोयीसाठी वाचनालयाचा कारभार संगणकाद्वारे हाताळला जातो. सर्व ग्रंथांचे बारकोडिंग करण्यात आले असून वाचक सेवा संगणकाद्वारे पुरवली जाते. वाचनालयाने ई-बुक सेवा वाचकांसाठी खुली करून दिली आहे. वाचनालयाचे संकेतस्थळ अतिशय सुनियोजितपणे वाचकांसाठी उपलब्ध आहे ज्यात वाचनालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथांची, संदर्भ किंवा दुर्मीळ ग्रंथांची तसेच वाचनालयातून होणाऱ्या उपक्रमांची इत्थंभूत माहिती मिळते.
वर्गणी
सभासदांसाठी ५० रुपये महिना, तर ५०० रुपये वार्षिक वर्गणी असून एका वेळी दोन पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जातात. आजीव सभासदांना १० हजार रुपये वर्गणी आहे. सध्या वाचनालयात १०० आजीव सभासद आहेत. बालविभागासाठी महिना केवळ २ रुपये वर्गणी आहे.
उपक्रम
कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे शहरातील सांस्कृतिक चळवळीत मोठे योगदान असते. त्याच अनुषंगाने वाचनालयातर्फे पु.भा. भावे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. महिन्यातून एकदा सर्व वाचक एकत्र येऊन पुस्तकांवर चर्चा करतात. त्यातून विचारांची आणि ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. वर्षांतून एकदा वाचकांसाठी कथा स्पर्धा घेतली जाते. आगामी उपक्रमात बालवाचकांसाठी बाल महोत्सव तसेच वाचनाविषयी निगडित बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्याचा ग्रंथालयाचा मानस आहे.
सभासदांसाठी लवकरच ‘अॅप’ची सुविधा
ग्रंथालयातर्फे सभासदांसाठी ‘अॅप’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्रंथालयाचा मानस आहे. या अॅपमध्ये ग्रंथशोध, नवीन पुस्तके, दुर्मीळ ग्रंथ यांसारखे अनेक पर्याय वाचकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे हवे ते नेमके पुस्तक शोधणे आता अधिक सोपे होणार आहे.
पुरस्कार
वाचनालयाद्वारे दरवर्षी साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. यात कवितेसाठी ‘कवी माधवानुज’, कथेसाठी ‘अंबादास अग्निहोत्री’, कादंबरीसाठी ‘वि.आ. बुवा’, वैचारिक लेखनासाठी ‘भारताचार्य वैद्य’ तसेच ठाणे जिल्हय़ातील कथा, कादंबरी, कविता, ललित या वाङ्मय प्रकारांत लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखकांना विशेष पुरस्कार दिले जातात.
मान्यवर भेट
लोकमान्य टिळकांनीही या ग्रंथालयास भेट दिलेली आहे. पु.भा. भावे व्याख्यानमालेच्या निमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दर महिन्याला वाचनालयात येत असतात. १९७८ मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवात कविवर्य कुसुमाग्रज उपस्थित राहिले होते. याशिवाय नागनाथ कोतापल्ले, विजया वाड, दासू वैद्य, अच्युत गोडबोले, अनिल अवचट, मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर यांसारख्या अनेक मान्यवर मंडळींनी संस्थेस भेट दिली आहे.
कल्याणच्या वाचन संस्कृतीचा केंद्रबिंदू
सार्वजनिक वाचनालय म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले ग्रंथालय. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात झपाटय़ाने शिक्षणाचा प्रसार होऊ लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2015 at 12:20 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading culture center of kalyan