माझ्या मराठीची गोडी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला वाटते अवीट

माझ्या मराठीचा छंद

मला नित्य मोहवित

 

ज्ञानोबांची तुकयाची

मुक्तेशाची जनाईची

माझ्या मराठीची गोडी

रामदास शिवाजीची..

ही कविता वाचताना, ऐकताना मराठी भाषेच्या प्रेमाने, आदराने आपला ऊर भरून येतो. पण त्याचबरोबर मराठी शाळांची कमी होणारी संख्या, मराठी वाचण्याची कमी होत असलेली आवड, इंग्रजीचा वाढता प्रभाव इ. गोष्टी आपल्याला काहीशा अस्वस्थ करतात. सर्व वयोगटांत वाचनाची कमी होत असलेले प्रमाण हा साऱ्या समाजासाठी एक चिंतेचा विषय आहे. नुकताच आपण मराठी राज्यभाषा दिन साजरा केला. या निमित्ताने शाळाशाळांतून मराठी पुस्तके वाचण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने कार्य प्रयत्न केले जात आहेत ते जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात चालू असलेल्या खरे तर यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या (२२ ते २३ वर्षे) बालवाचनालयाच्या उपक्रमाचा विशेषत्वाने उल्लेख करायला हवा. लहान शिशू आणि मोठय़ा शिशू वर्गाचे विद्यार्थी दर आठवडय़ाला बालवाचनालयामधील पुस्तक घरी घेऊन जातात. या उपक्रमासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लहान शिशू वर्गाचे पालक स्वत: येऊन मुलांच्या आवडीनुसार पुस्तक निवडतात, तर मोठय़ा शिशूवर्गात ही जबाबादारी वर्गशिक्षकच पार पाडतात. अगदी लहान वयात पुस्तकांची ओळख होते आणि संस्कारक्षम वयात सहजपणे वाचनसंस्कार पालक आणि शाळेच्या सहकार्याने होण्यास सुरुवात होते. पालकांच्या मदतीने, त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारीत पुस्तके हाताळतात, चित्रांचा आनंद घेताना गोष्टीची मजा अनुभवतात आणि अनेक गोष्टी (निसर्ग, पशू, पक्षी, फळे, भाज्या इ.) शिकतात. पालक आणि मूल यांच्यात संवाद तर होतोच, पण त्यांच्यातले नातेही अधिक दृढ होण्यास मदत होते. बालवयात केलेले संस्कार हे कायमस्वरूपी असल्याने बालवाचनालयाचा उपक्रम हा विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणारा, त्यांच्या माहितीत भर टाकणारा, पालक आणि मुलांना जवळ आणणारा असल्याने निश्चितच अनुकरणीय असाच आहे.

अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी गावातील शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेकविध उपक्रम कल्पकतेने राबवले जातात. आदिवासी बांधवांचे आणि आपले जीवन यात फार मोठी तफावत आहे. त्यांची जीवनशैली, आहार, भाषा वेगळी असल्याने खूप प्रयत्न करावे लागतात. या मुलांना मराठी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘माझ्याकडे पाहा’ हा खुल्या वाचनालयाचा उपक्रम इथे कल्पकतेने राबवला जातो. शाळेच्या व्हरांडय़ामध्ये खुल्या वाचनालयांतर्गत दोन पुस्तकांचे स्टॅण्ड ठेवले जातात. जाता येता विद्यार्थ्यांना या स्टॅण्डमधील पुस्तके सहज दृष्टीस पडतात. विशेषत: १ली ते ४थीच्या मुलांमधील औत्सुक्य जागृत होते आणि ते पुस्तके हाताळायला सुरुवात करतात. जेव्हा ऑफ पीरिअड असतो तेव्हादेखील पुस्तकांची पेटी वर्गावर्गातून ठेवली जाते. आज शाळेच्या ग्रंथालयात जवळपास पाच हजार पुस्तके आहेत आणि या प्रयत्नांना यश दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागली आहे आणि त्यामुळे दरवर्षी नवीन पुस्तके आवर्जून ग्रंथालयात समाविष्ट केली जातात.

वर्तकनगर परिसरातील बाल विकास विद्यामंदिर शाळादेखील मुलांना वाचनाची गोडी लावावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करते. कष्टकरी समाजातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने येत असल्याने शाळा आपली जबाबदारी लक्षात घेऊन सातत्याने प्रयत्न करते. कुसुमाभुज प्रतिष्ठानची बालवाङ्मयाची पेटी शाळेत ठेवण्यात आली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयातूनदेखील दर महिन्याला इ.१ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानात भर टाकणारी पुस्तके या विद्यार्थ्यांना मिळतात. दर शनिवारी प्रत्येक वर्गाचा वर्ग प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांचे वाटप करतो. शाळेव्यतिरिक्त अर्धा तास पुस्तक वाचनासाठी राखून ठेवण्यात आला आहे. साधारणपणे ८ ते १० मुलांचा गट करून वाचलेल्या पुस्तकांबद्दल मग विद्यार्थी एकमेकांना माहिती देतात.

वर्तकनगर येथील थिराणी विद्यालयातदेखील विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचावीत म्हणून एक कल्पक उपक्रम राबवला जातो. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर मुलांची पावले मैदानाकडे वळतात. तेथे पुस्तकांची पेटी ठेवली जाते आणि मुले हळूहळू पुस्तके वाचू लागतात असे दिसून येते. शिवाय घडय़ाळी एक तासिका पुस्तक वाचनासाठी राखून ठेवण्यात येते (इ. ५वी ते १०वी).

वसंतविहार परिसरातील अनमोल विद्यामंदिर शाळेतर्फे मराठी भाषेची महती विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांना कळावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मोठी ग्रंथदिंडी काढली जाते आणि ती पाहण्यासारखी असते. दर महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पुस्तक वाचायचे आणि त्यावर आपल्या शब्दात लिहायचे आणि अशा लिखाणाच्या वह्य़ा विद्यार्थी तयार करतात. त्यांना मराठी साहित्याची ओळख व्हावी आणि गोडी लागावी म्हणून मराठी वाङ्मय मंडळातर्फे दर महिन्याला लेखक, कवी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद विद्यार्थ्यांना साधता येतो. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला, लेखन कौशल्याला वाव मिळावा म्हणून वर्षभर अनेकविध उपक्रम राबवले जातात. या वर्षी तर मराठी दिनानिमित्ताचे औचित्य साधून मराठी कट्टा या अभिनव उपक्रमास प्रारंभ केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार होण्याच्या व्यापक उद्देशाने ग्रंथालीच्या ठाणे केंद्रातर्फे १९९८ पासून वाचक दिनाचा उपक्रम तळमळीने राबवला जात आहे. दरवर्षी नावीन्यपूर्ण विषयास प्राधान्य देताना विद्यार्थी सकस मराठी साहित्याशी जोडले जावेत आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि मुलांमधील सर्जनशीलतेला वाव मिळावा असा व्यापक विचार या उपक्रमामागे आहे. खरे तर हल्लीच्या काळात अनेकविध स्पर्धाचे पेव फुटले आहे. पण बऱ्याचदा त्यामध्ये विजयी होण्यासाठी पालक, शिक्षक आणि उपलब्ध तयार माहिती देणाऱ्या पर्यायांच्या साहाय्याने विद्यार्थी यश प्राप्त करतात. ग्रंथालीच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत: दिलेल्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना गरज भासते तेव्हा पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. सादरीकरणाबाबत मार्गदर्शन दिले जाते आणि सातत्याने सहभागी होण्यासाठी, तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या अविनाश आणि नंदिनी बर्वे, श्रीधर गांगल या त्रिमूर्तीला, कळकळीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना शतश: धन्यवाद द्यावेसे वाटतात. आज ठाणे शहरातील कानाकोपऱ्यातील कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना सामील करून घेण्यासाठी विशेषत्वाने भर दिला जातो. त्यामुळे रामचंद्र नगर, सावरकर नगर, किसन नगर इ. भागांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम वरदान ठरला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading culture have to enhance