ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन असे म्हणतात. स्वत:चे अनुभवविश्व अधिक प्रगल्भ करण्यासाठी ‘दिसामाजी काहीतरी चांगले वाचीत जावे’ असे म्हणतात. आपापल्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचलेली अनेक मंडळी पुस्तके हेच आपले गुरू असल्याचे वेळोवेळी सांगतात. पण ही मंडळी नेमकं वाचतात तरी काय? त्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ कसा काढतात? त्यांच्या संग्रहात कोणती पुस्तके आहेत? असे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. अशाच प्रश्नांना उत्तरे देणारे ठाणे परिसरातील नामवंत मंडळींचे वाचनाविषयीचे मनोगत..
आमच्या चिपळूणमधील घरात पुस्तकांना पोषक वातावरण होते. आईला पुस्तके वाचायची आवड होती. आमच्या घरी त्यावेळी अडीचशे पुस्तकांचा संग्रह होता. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांपैकी एक आहे. तिथे आठवडय़ातून तीनदा पुस्तके बदलण्याची सोय होती. त्यामुळे लहानपणीच माझ्यावर वाचनाचे संस्कार झाले. त्याची आवड निर्माण झाली. माझे वडील आणि भाऊ दोघेही हौशी रंगभूमीवर काम करीत होते. त्यामुळे घरात नाटकांविषयी चर्चा होत असे. त्यामुळे नाटके वाचण्याचाही छंद जडला. बाळ कोल्हटकरांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ ही नाटके त्याकाळात मी वाचून काढली. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’ ही पुस्तकेही त्याच काळात वाचली. ‘आहे मनोहर तरी’ हे सुनीताबाई देशपांडेंचे पुस्तकही अतिशय आवडले.
वाचनाची आवड जोपासण्यास युनायटेड इंग्लिश स्कूल या माझ्या शाळेची खूप मदत झाली. लहानपणी आसपासचे वातावरण चांगले होते. वाचनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होत होता. सुट्टीमध्ये भावंडे एकत्र राहायला आली की पुस्तकांची देवाणघेवाण व्हायची. नवीन वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळाली. वृत्तपत्र वाचनाची आवड होती. ‘लोकसत्ता’ घरी येत होता. पुरवण्यांमध्ये प्रसिद्ध होत असलेले लेख आवर्जून वाचत होते. टी.व्ही. पाहण्याची विशेष आवड नव्हती. त्यामुळे तो वेळ पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्यात सार्थकी लागला. प्रवासाची आवड असल्याने वाचन छंदाला प्रवासाची जोड मिळाली.
महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. त्यावेळी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ची गाडी फिरायची. परवडणाऱ्या किमतीत पुस्तके वाचायला मिळायची. कन्नड, तमिळ अनुवादित कथांचे वाचन त्यामुळे झाले. यूपीएससी परीक्षेसाठी मराठी साहित्य हा विषय होता. त्यामुळे मराठी साहित्याचे ठरवून वाचन केले. त्यातून अनेक पुस्तकांचा संग्रह तयार झाला. इंग्रजी आणि मराठी भाषेतील अभिजात साहित्य आणि स्त्रीवादी विषयांवरील तब्बल दीड हजार पुस्तके माझ्या संग्रही होती. पाककला, अध्यात्म, समाज जीवन अशी विविध विषयांवरील प्रत्येकी ३० ते ४० पुस्तके माझ्या संग्रही होती. गेल्या दहा वर्षांत अनेक पुस्तकांची भर माझ्या संग्रही पडली. ‘सीईओ’ असताना मायक्रो फायनान्स या विषयातील पुस्तके घेतली. योगी अरविंद यांच्या अध्यात्माविषयीच्या पुस्तकांपासून अमर्त्य सेन यांचे ‘ऑग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’पर्यंत अनेक पुस्तके संग्रही आहेत. विजया राजाध्यक्ष, बा.सी. मर्ढेकर, ग्रेस यासारख्या कवींचे कविता संग्रह आहेत. कवितेवरील काही समीक्षणात्मक पुस्तके आहेत. भगवद् गीतेतील तत्त्वज्ञान उत्तमपणे विषद करणारी विविध पुस्तके संग्रहात आहेत. योगीराज ब्रह्मचरण लाहिली, पुराणपुरुष अशी पुस्तके, मेघना पेठे यांच्या कथा वाचल्या. विविध प्रकारचे साहित्य वाचत असले तरी कादंबरी हा साहित्य प्रकार जास्त आवडीचा आहे.
सध्या महाबळेश्वर सैल यांची ‘तांडव’ ही अतिशय सुंदर कादंबरी नुकतीच वाचली. मिलिंद बोकील यांची ‘गवत्या’ कादंबरी वाचली आहे. घराच्या दर्शनी भागातच पुस्तकांचे कपाट असल्याने कधीही वाचन होते. एखादे पुस्तक वाचायला घेतल्यास दोन ते तीन दिवसात वाचून पूर्ण होते. किरण नगरकर यांची ‘ककल्ड’ ही १५०० पानांची कादंबरी दोन ते तीन दिवसांत वाचून पूर्ण केली. भालचंद्र नेमाडे यांची स्वाक्षरी असलेली ‘हिंदू’ कादंबरी तसेच अॅना कटालिनाची दुर्मीळ प्रत घरातील पुस्तकांच्या संग्रहात आहे.
वाचन छंदाला प्रवासाची जोड
आमच्या चिपळूणमधील घरात पुस्तकांना पोषक वातावरण होते.
Written by किन्नरी जाधव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-01-2016 at 00:46 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading experience of famous people