राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पण, आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. बिहारमधील राजकीय घडामोडींवर भाजपचे सुशील मोदी यांनी भाष्य केले आहे. भाजप मित्र पक्षांना धोका देत नाही. पण जे भाजपला धोका देतात, त्यांचे काय होते हे महारष्ट्रात पहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. बिहारमध्ये आमच्या पक्षाचे ७५ जण तर जेडीयुचे ४२ जण निवडून आले होते. तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. तिथे आज सरकार गेले आहे. पण, तिथे आमचे सरकार पुन्हा येईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पण, आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेच्या चिन्हाच्या वादाबाबत त्यांना विचारले असता, याबाबत त्यावेळेस कायदे नव्हते पण, आज कायदे अस्तित्वात आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे कायद्यानेच लढाई लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे ५० आमदार आहेत आणि आमच्या पक्षाचे ११५ आमदार आहेत. तरीही आम्ही त्यांना मुुख्यमंत्री पद दिले आहे. काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असा १८ जणांचा शपथविधी झाला. पवार साहेब यांचे दुखणे वेगळे आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.