नितीन जंक्शन भुयारी मार्गाचे वास्तव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका मुख्यालयात विकसित ठाणे म्हणून नितीन कंपनी भुयारी मार्गाचे अतिशय सुंदर छायाचित्र लावण्यात आले असले तरी वास्तवात येथील परिस्थिती गंभीर आहे. अस्वच्छता, गर्दुले आणि प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांमुळे सर्वसामान्य ठाणेकरांना या भुयारातून मार्गक्रमण करणे अडचणीचे आणि कटकटीचे ठरू लागले आहे.

महानगपालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एका मोठय़ा छायाचित्राच्या फ्रेममध्ये ‘विकसित प्रेक्षणीय, ठाणे शहर’ अशा मथळ्याखाली हे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याखाली ‘सुरक्षित भुयारी मार्ग, स्वच्छ-सुलभ पायवाट’ अशी ओळ आहे. प्रत्यक्षात मात्र येथील वास्तव अतिशय वेगळे आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग तयार झाल्यानंतर पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा यासाठी पालिकेने सहा वर्षांपूर्वी नितीन कंपनी जंक्शन येथे सुसज्ज भुयारी मार्ग तयार केला. मात्र, मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भुयारी मार्गाच्या देखभालीकडे प्रशासनाने कानाडोळा केला. त्यामुळे लवकरच त्याची दुरवस्था झाली.  या भुयारी मार्गात सुरक्षा रक्षक नसल्याने रात्रीच्या वेळेत येथे गर्दुल्ले आणि प्रेमी युगुले असतात. त्यामुळे रात्री आठनंतर काजूवाडी, लुईसवाडी परिसरातील रहिवासी रात्री आठनंतर या मार्गाचा वापर टाळतात.

भुयारी मार्ग बनविला तेव्हा येथे चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ही सीसीटीव्ही यंत्रेच चोरीला गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तसेच अस्वच्छता असल्यामुळे येथे भटक्या श्वानांचा वावर होत आहे. भुयाराच्या प्रवेशद्वारात महानगरपालिकेने ‘भुयारामध्ये सुरक्षा रक्षक आहेत..’ अशा आशयाचा फलक लावला आहे. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी पालिकेचा एकही सुरक्षा रक्षक उपलब्ध नाही. महत्त्वाचे म्हणजे येथे अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही नाही. इथे उद्घोषणा ध्वनी यंत्रे बसविण्यात येणार होती, मात्र अद्याप त्यांचा पत्ता नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reality of nitin junction subway