डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली शहराजवळील दिवा-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या दातिवली गावाजवळ रेल्वे स्थानकाची नव्याने उभारणी करावी. सध्या या स्थानकाला असलेला थांबा स्थानकाचा दर्जा काढून पूर्ण स्थानकाचा दर्जा देण्यात यावा. दातिवलीसह या भागात नव्याने विकसित झालेल्या गृहसंकुलातील नोकरदार, विद्यार्थी यांना या स्थानकाचा सर्वाधिक लाभ होईल, अशी मागणी कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली.
दातिवली स्थानक परिसरातील नागरीकरण झालेला भाग, या स्थानकाचा भविष्याचा विचार करून रेल्वे आणि प्रवाशांना होणारा फायदा, स्थानक उभारणीतील तांत्रिक अडथळे, सल्लागारांच्या सूचना या सर्वाचा विचार करून या स्थानकासंदर्भात विचार केला जाईल, असे आश्वासन खासदार शिंदे यांना राज्यमंत्री दानवे यांनी दिले.
दिवा-कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दातिवली गाव आहे. डोंबिवली, दिवा पूर्व, लोढा-पलावा वसाहतींचा नागरीकरण झालेला भाग दातिवली गावांपर्यंत आला आहे. या विस्तारित भागातील नोकरदार मुंबई, कर्जत, कसारा, पनवेल भागात नोकरी, व्यवसायासाठी नियमित जातो. तसेच, विद्यार्थी ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये जातात. सध्या येथील रहिवासी दिवा किंवा कोपर रेल्वे स्थानकात येऊन रेल्वे प्रवास सुरू करतात. या रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी रस्ते मार्ग नसल्याने प्रवासी रेल्वे मार्गातून स्थानक गाठतात, असे खासदार शिंदे यांनी राज्यमंत्री दानवे यांच्या निदर्शनास आणले.
दातिवली स्थानकाची सुसज्ज उभारणी करा, ही मागील चाळीस वर्षांपासूनची लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटनांची मागणी आहे. कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, वसई-विरारकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांना दातिवली स्थानकात थांबा मिळाला तर डोंबिवली, दिवा, कोपर स्थानकांवर दातिवली भागांतील प्रवाशांचा येणार भार कमी होईल. दातिवली स्थानकाला थांबा स्थानकाचा दर्जा आहे. याठिकाणी लांब पल्ल्याच्या गाडय़ा दोन मिनिटांसाठी थांबतात. या स्थानकाला पूर्ण स्थानकाचा दर्जा मिळाला तर स्थानकात रेल्वे जीना, नवीन फलाट उभारणी, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, तिकीट खिडकी या सुविधा उपलब्ध होतील. या सुविधांमुळे दातिवली स्थानकातील प्रवासी संख्या वाढून रेल्वे महसुलात वाढ होईल, असे खासदार शिंदे यांनी म्हटले आहे.
निळजे रेल्वे स्थानकातून प्रवास
लोढा, पलावा, निळजे, नेवाळी परिसरातील अनेक नोकरदार डोंबिवली स्थानकात न येता, दिवा-पनवेल मार्गावरील निळजे रेल्वे स्थानकात येऊन तेथून दिवा रेल्वे स्थानकात येतात. मग मुंबई-कल्याण दिशेचा प्रवास सुरू करतात, असे पलावा गृहसंकुलातील रहिवाशांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा