ठाणे – राज्य परिवहन विभागाने लागू केलेल्या नविन भाड्यांमध्ये चालकांना त्यांचे रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करावे लागते. त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत आतापर्यंत १४ हजार ४२८ रिक्षांच्या मीटरचे रिकॅलिब्रेट करण्यात आले असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने मान्यता दिली. यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रूपये झाले आहे. टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची अंमलबजावणी झाली असून, मीटरमध्ये बदल करण्यासाठी चालकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार, मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत ठाणे महापालिका, भिवंडी महापालिका, मिराभाईंदर महापालिका आणि शहापुर तालुका येतो. ठाणे, भिवंडी, मिराभाईंदर आणि शहापूर या शहरांमधील विविध भागात ८० हजाराच्या आसपास रिक्षा धावतात. यातील काही रिक्षा शेअरिंग पद्धतीने तर, काही मीटर पद्धतीने चालवल्या जातात. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार, ठाणे भिवंडी, मिराभाईंदर आणि शहापूर या भागात आतापर्यंत १४ हजार ४२८ रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेट करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून आलेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे. तरी, रिक्षा चालकांनी लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेट करुन घ्यावे असे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभगाकडू करण्यात आले आहे.

मीटरमध्ये नवीन दर दिसण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे, मीटर पासिंग करणे या प्रक्रियेसाठी परिवहन आयुक्तालयाकडून ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच प्रादेशिक परिवह विभागासह काही दलाल देखील हे काम करुन देतात. तर, त्यांच्याकडून आरटीओच्या दरापेक्षा चारशे रुपये अधिक म्हणजेच ११०० रुपये दर आकारले जातात. आरटीओ अंतर्गत मीटर पासिंग करायचे म्हटले तर, कळवा येथील पटणी जवळील मैदानात जावे लागते. त्याठिकाणी मीटर पासिंग करण्यासाठी दोन ते तीन तास थांबावे लागते. त्यामुळे रिक्षाच्या धंड्याचे नुकसान होते. म्हणून, सर्वाधिक रिक्षा चालक दलालांकडे मीटर पासिंग करायला जातात. दलालांकडे अवघ्या काही वेळात मीटर पासिंग होते. केवळ दस्तऐवजीकरणासाठी आठवडा लागतो, असे ठाण्यातील एका रिक्षा चालकाने सांगितले.

Story img Loader