कल्याण : निळजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे अवजड काम विहित वेळेच्या एक दिवस अगोदरच पूर्ण झाले. पुलाची लहान, किरकोळ स्थापत्य कामे आता पूर्ण केली जात आहेत. ही कामे आता पुलाखालील किरकोळ कामे असल्याने वाहतुकीचा या कामांशी संबंध नाही. त्यामुळे पुलावरील वाहतूक सोमवारी रात्री १२ वाजल्यानंतर आता नियमित सुरू होऊ शकेल, असे रेल्वेच्या अभियंत्याने सांगितले.तर, रेल्वेची कामे पाहून याबाबतचा अंतीम निर्णय घेतला जाईल, असे एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले. शिळफाटा रस्ता मागील पाच दिवसांपासून निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी बंद आहे. या रस्त्यावरून फक्त हलकी वाहने धावतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा चाकी जड, १२, २४ चाकी अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदी आहे. मालवाहू अवजड वाहतूक मागील पाच दिवसांपासून खोणी नाका, शिळफाटा कल्याण फाटा मुंब्रा, खारेगावमार्गे, नेवाळीमार्गे सोडली जात आहे.निळजे रेल्वे पुलासाठी खोदकाम, खोदकाम केलेल्या खाच्यामध्ये तयार १९ सीमेंट काँक्रीटच्या भक्कम चौकटी बसविण्याचे काम पाच दिवसांच्या कालावधीत करण्यात आले. पुलाच्या खाच्यामध्ये चौकटी बसविण्याचे आव्हानात्मक मागील तीन ते चार दिवसांमध्ये दिवस, रात्र करण्यात आले.

आता १९ चौकटींंमध्ये काँक्रीट टाकून त्या बंदिस्त करणे, पुलाखालील चारही बाजुचा भाग बंदिस्त करून घेण्याचे काम सुरू आहे. शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद राहणार असल्याने या रस्त्यावरील कोंडीच्या भीतीने अनेक प्रवाशांनी पयार्यी रस्ते मार्गाने प्रवास करणे पसंत केले. तर काही प्रवाशांनी कोंडीत अडकून तासन तासन एकाच जागी अडकून पडण्यापेक्षा घरातून कार्यालयीन काम करणे पसंत केले. शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे जाणारी वाहतूक लगतच्या पलावा चौक, लोढा, निळजे, काटई, खिडकाळी रहिवाशांसाठी खुली ठेवण्यात आली होती. या रस्त्यावरून बाहेरची हलकी वाहने धावत होती.

काही हलकी वाहने निळजे पुलावर कोंडी होऊ नये म्हणून काटई चौक खोणी तळोजा मार्गे सोडण्यात येत होती. काही वाहन चालकांनी माणकोली पूलमार्गे, गोविंदवाडी, दुर्गाडी कोनमार्गे इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहन भार मागील पाच दिवस कमी प्रमाणात होता.या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी १५० वाहतूक पोलीस, कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. शिळफाटा रस्ता मंगळवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत सुरू होण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reconstruction of nilaje railway bridge was completed day early with minor works remaining sud 02