कल्याण – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत पुरेसा कर्मचारी वर्ग असताना आणि यापुर्वीच्या नोकरभरत्या वाद्गग्रस्त ठरल्या असताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत ३७ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समितीत कामचलावू संचालक मंडळ आहे. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार संचालक मंडळाला नाहीत. असे असताना ही नोकर भरतीची घाई कशासाठी आणि कोणासाठी केली जात आहे, असे प्रश्न अनेक माजी संचालक, काही जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. बाजार समितीचा आवाका पाहून यापूर्वीच कल्याण कृषी बाजार समितीत नोकर भरती करण्यात आली आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग बाजार समितीत आहे, असे माजी संचालक नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगतात.

यापूर्वी अशा नोकरी भरती कल्याण बाजार समितीत करण्यात आल्या. त्यामधील काही वाद्गग्रस्त, तर काही रद्द कराव्या लागल्याची चर्चा आहे. आता ३७ कर्मचारी भरती करून त्यांचा वेतनाचा आर्थिक बोजा बाजार समितीवर पडणार आहे. बाजार समितीचा महसूल, उत्पन्न आवाक पाहता खरच अशा नोकर भरतीची गरज आहे का, असे प्रश्न जागरूक माजी संचालक उपस्थित करत आहेत. या नोकर भरतीत आपल्या सोयीचे उमेदवार भरती व्हावेत म्हणून काही जण जोरदार प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक निवृत्त अभियंता आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला २१ एप्रिल २०२५ पर्यंत पणन मंडळाच्या संचालकांनी मुदतवाढ दिली आहे. ही मुदत २१ एप्रिल २०२४ रोजी संपली होती. जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचालक मंडळाला ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंंतर बाजार समितीच्या निवडणुका डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याच्या निर्णय शासन, पणन मंडळातर्फे घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात बाजार समितीवर प्रशासक नेमण्याची हालचाल झाली होती. प्रशासक नेमण्याचा आदेश रद्द करून बाजार समितीच्या निवडणुका होईपर्यंत एप्रिल २०२५ पर्यंत संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश पणन मंडळाने काढले. या संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंधक घालण्यात आला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत काही निर्णय घ्यायचा असल्यास पणन मंडळाची पूर्व मंजुरी आवश्यक करण्यात आली आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शासन परवानगीने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये बेकायदेशीर काही नाही. जी भरती होणार आहे ती शासन नियमाप्रमाणे आहे. समितीच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डॉ. किशोर मांडे, जिल्हा सहकारी उपनिबंधक, ठाणे</p>

बाजार समितीत शासन परवानगीने भरतीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया २०२३ पासून राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी शासन मान्यतेने आता केली जात आहे. लिपिक, स्वच्छता सेवक, रखवालदार आणि इतर असा कर्मचारी वर्ग या भरती प्रक्रियेत आहे. संजय एगडे सचिव,कल्याण बाजार समिती.