लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता अशी एकूण ७० पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीची प्रकिया ठाणे महापालिकेने सुरू केली असून मंगळवारी पालिका मुख्यालयात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे रुग्णांची होणार गैरसोय टळण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात पाचशे खाटांचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्णालय अपुरे पडत आहे. हि बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविली जात असतानाच, दुसरीकडे रुग्णालय आणि महाविद्यालयात प्राध्यापक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून त्याचा रुग्णांना फटका बसत असल्याची बाब पुढे आली होती.

हेही वाचा… घोडबंदरवासियांची रिक्षा संघटनेच्या नावाने प्रवाशांची लूट, मीटरऐवजी दुप्पट रक्कम घेऊन केली जाते प्रवाशांची वाहतूक

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील ७ प्राध्यापक, ८ सहयोगी प्राध्यापक आणि ५५ अधिव्याख्याता, अशी एकूण ७० पदे रिक्त आहेत. हि पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पालिकेने भरती प्रक्रीया सुरू केली आहे. अधिव्याख्याता पदांसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची मुलाखत मंगळवारी पालिका मुख्यालयात घेण्यात आली. तर, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदासाठी इच्छूक उमेदवारांची बुधवारी मुलाखत घेण्यात येणार आहे. प्राध्यपक पदासाठी १ लाख ८५ हजार, सहयोगी प्राध्यापक पदासाठी १ लाख ७० हजार आणि अधिव्याख्याता पदासाठी एक लाख रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. यानंतर वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ या पदांची भरती केली जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment process of shivaji maharaj hospital and rajiv gandhi medical college kalwa has started dvr
Show comments