निखिल अहिरे
ठाणे : मार्च ते मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत लाल मिरच्यांची आणि मसाला बनविण्यासाठी लागणाऱ्या इतर जिन्नसांना मोठी मागणी असते. जानेवारी महिन्यापर्यंत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात चक्रीवादळ, अवकाळी पाऊस झाल्याने तेथील मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे. मागणी असल्याने मुंबई आणि ठाणे या भागांमध्ये मिरचीच्या दरांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इंधन दरवाढीमुळे मसाल्यासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या दरातही सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तिखटपणासाठी तेजा मिरचीचा तर मसाल्याला लाल रंग येण्यासाठी बेडगी मिरचीची ग्राहकांकडून खरेदी केली जाते. या खालोखाल संकेश्वरी, काश्मिरी, रेशमपट्टी या मिरच्यांची खरेदी केली जाते.
संकेश्वरी मिरचीचे उत्पादन कोल्हापूरमधील गडिहग्लज, तेजा मिरचीचे उत्पादन तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि बेगडी मिरचीचे उत्पादन हे कर्नाटक राज्यात घेतले जाते. या राज्यातून नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला बाजारात मिरच्या विक्रीसाठी दाखल होत असतात. यंदा पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस धडकल्याने मिरची पिकाला नुकसान झाले. त्यामुळे मिरची उत्पादनात घट झली. मात्र ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींकरिता यंदाचा मसाला महागला आहे.
दाक्षिणात्य मिरची बाजार थंडावला
तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये यंदा अवकाळी पाऊस झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर आणि खमाम, तेलंगणामधील वारंगल, कर्नाटकमधील खंडगी, हुबळी या शहरांमध्ये मोठा मिरची बाजार भरतो. या ठिकाणाहून संपूर्ण देशभरात तसेच अमेरिका, चीन यांसारख्या देशांमध्ये मिरची निर्यात केली जाते. प्रतिदिन या बाजारातून सुमारे ६ ते ७ लाख गोणी मिरच्यांची विक्री केली जाते. मात्र या वर्षी ही विक्री तब्बल निम्म्यावर आली आहे.
दरवाढ किती?
मिरचीच्या दरात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेजा मिरची १८० ते २२०, बेडगी ३५० ते ४००, काश्मिरी ४०० ते ५०० आणि रेशमपट्टी ४५० ते ५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. दगडफूल, धणे, खसखस, लवंग, तेजपत्ता, जिरे यांची विविध राज्यातून नवी मुंबई एपीएमसी येथे आवक होत असते. मागच्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ झाल्याने यांच्या वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. जिन्नसांच्या दरात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे जिन्नस सध्या ९० रुपयांपासून १,४०० रुपयांपर्यत प्रति किलोने विकले जात आहेत, अशी माहिती मिरची व्यापारी अमरीश बारोट यांनी दिली.
मागील वर्षी एक एकरातून सुमारे ४ ते ५ क्विंटल लाल मिरचीचे पीक घेतले होते. या वेळी अवकाळी पावसामुळे निम्म्याहूनही कमी मिरचीचे पीक निघाले आहे. अवकाळी पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे मागील वर्षीपेक्षा कमी माल बाजारात विक्रीसाठी आणला आहे.-सुलेमान नदाब, मिरची उत्पादक, बेलवल कोप्पा, कर्नाटक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा